वंदे मातरम म्हणणार नाही म्हणजे नाहीच !

0

मुंबई । मद्रास उच्च न्यायालयाने वंदे मातरमची सक्ती करण्याचा मुद्दा आता महाराष्ट्रातही चिघळण्याची शक्यता दिसत असून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आणि एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी प्राण गेला तरी बेहत्तर पण वंदे मातरम म्हणणार नसल्याची भूमिका मांडत नव्या वादाला निमंत्रण दिले आहे.

तमिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये ’वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक असल्याचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला होता. के. वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. यावर आता महाराष्ट्रातही राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज, सरकारी कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले. वेळ पडली तर सभागृहात आवाज उठवेन, असंही पुरोहित म्हणाले. याचे अतिशय तीव्र पडसाद उमटून अबू आझमी आणि वारीस पठाण यांनी याचा विरोध केला.

सन्मान करतो पण…!
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी ‘कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम’ गाणार नाही, असं म्हणत शुक्रवारी नवा वाद छेडला. ‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मी ‘वंदे मातरम’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’ असं अबू आझमी म्हणाले.

गळ्यावर सुरी ठेवली तरीही…
एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही वंदे मातरमच्या सक्तीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् बोलणार नाही. कोणीही कोणतीही विचारधारा कोणावर थोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन’ असं एमआयएमचे आमदार वारिस पठाण म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारं हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत.’ अशा शब्दांमध्ये रावतेंनी पठाण यांच्यावर हल्लाबोल केला.