‘वंदे मातरम्’ वरून विधानसभेत हल्लाबोल

0

मुंबई : मुस्लिम धर्मात सांगितले असल्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अबू आझमी यांच्या विरोधात विधानसभेत हल्लाबोल करण्यात आला. या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावेच लागेल आणि वंदे मातरम म्हणायचे नसेल तर आपल्या देशात जा अशा शब्दात भाजपच्या ज्येष्ठ सदस्य एकनाथराव खडसे , अनिल गोटे यांनी आझमी यांच्यावर टीका केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे अनिल गोटे यांनी अबू आझमी आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देणाऱ्या वारीस पठाण यांचा निषेध केला. यावेळी अबू आझमी यांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला असता गोटे यांनी चिडून ‘ नीचे बैठ’, ‘ऐ, खाली बस’ अशा शब्दात खडसावत अशी वाक्य करायला पाकिस्तानात तरी परवानगी आहे का? असा सवाल केला.

या चर्चेत खडसे यांनी भाग घेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वंदे मातरम हे गीत गायलेले आहे असे सांगत जिथे आपण राहतो, जिथे खातो, जगतो आणि मरतो त्या भूमीचा सन्मान करण्यात काय गैर आहे? असा सवाल करत आझमी यांना फैलावर घेतले. कोणत्या धर्मात सांगितलंय की वंदे मातरम म्हणू नका? असे म्हणत सगळं फुटकात घेणार आणि वंदे मातरम म्हणणार नाही अशी मुजोरी चालणार नाही असे खडसे यांनी सांगितले.

यावेळी अबू आझमी यांनी कोणतेही गीत गाऊन देशभक्ती सिद्ध होत नाही. मनातून भावना पाहिजे असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतिहासातील मुस्लिम शिलेदारांची उदाहरणे दिली. आमचा धर्म आम्हाला हे म्हणायला विरोध करतो म्हणून आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही असे अबू आझमी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड उठले असता भाजप सदस्य आणखीनच आक्रमक झाले. सेना- भाजप सदस्यांनी यावेळी घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना खाली बसण्याच्या सूचना केल्या यानंतर सदस्य शांत झाले.