वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेचा खून

0

सज्जनवाडी येथील घटना : तीन मुली झाल्याने शस्त्राने केले वार
पतीसह सासू, सासर्‍यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कामशेत : वंशाला दिवा हवा म्हणून नवरा आणि सासू, सासरा यांनी मिळून विवाहितेचा अमानुषपणे छळ केला. यातूनच तिघांनी मिळून धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिचा खून केला. ही घटना मावळ तालुक्यातील सज्जनवाडी येथे शुक्रवारी (दि. 6) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. मनीषा यश केदारी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात सुनील राम गोरे (वय 31, रा. लोणावळा, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार विवाहितेचा नवरा यश उर्फ भाऊ साधू केदारी, सासू अंजना साधू केदारी आणि सासरा साधू शंकर केदारी (सर्व रा. सज्जनवाडी, ताजे, ता. मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुुलग्यासाठी छळ सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा आणि यश यांचे मागील काही वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांना तीन मुली आहेत. चौथ्या वेळी तरी आपल्याला मुलगा व्हायला हवा, असा हट्ट यशने मनीषाकडे केला. मनीषा यशला वारंवार समजावत होती. मात्र, यश आणि त्याचे आई-वडील यांनी मिळून मनिषाचा छळ करण्यास सुरुवात केली. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला. वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून तिला मारहाण केली जात होती.

डोक्यात घातला कोयता
शुक्रवारी सकाळी मनिषा शेतात कामाला जात नसल्याच्या कारणावरून तिला मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनिषाचा भाऊ सुनील याने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सासू अंजना हिला ताब्यात घेतले आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.

तिन्ही मुली झाल्या पोरक्या
वंशाला दिवा हवा असल्याच्या हव्यासापोटी महिलेचा खून करण्यात आला. ही घटना सामाजिक पुढारलेपण मिरविणा-या समाजाला सुरुंग लावणारी आहे. या घटनेमुळे एक कुटुंब उध्वस्त झाले. खून झालेल्या महिलेला तीन मुली आहेत. त्यांचे आई-वडिलांशिवाय काय होणार? त्यांच्यावर कोणते संस्कार होणार? त्या मुलीसुद्धा वंशाच्या दिव्याचा धसका घेऊनच जगणार का? असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.