ठाणे : अॅडव्होकेट्स कायद्यातील प्रस्तावित अन्यायकारक व अवाजवी सुधारणांचा निषेध करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे ६५०० हजार वकिल आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील कामकाज आज पूर्णत: ठप्प झाले. त्याचा फटका हजारो पक्षकारांना बसला.
देशातील वकील संघटनांची शिखर संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाने सर्व वकिलांना आजचा एक दिवस कामापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सर्वच वकिलांनी आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहत अॅडव्होकेट्स कायद्यातील प्रस्तावित अन्यायकारक व अवाजवी सुधारणांचा निषेध नोंदवला. ठाणे न्यायालयातील सुमारे अडीच हजार तर जिल्हाभरातील सुमारे ६५०० हजार वकील या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. पी. बी. भोसले यांनी दिली. सदर कायद्यातील प्रस्तावित काही सुधारणा वकिलांच्या हिताच्या नसल्याने त्याला वकिलांचा विरोध असल्याची प्रतिक्रिया कल्याण येथील वकील जनार्दन टावरे यांनी व्यक्त केली आहे.