वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू करावा

0

पिंपरी-चिंचवड : शहरासह राज्यभरात विविध वकील प्रॅक्टिस करत आहेत. मात्र, वकिलांच्या सुरक्षितेबाबत कोणीही विचार करीत नाही. पुणे तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हजारो वकील आहेत. त्यातील अनेक जण जोखमीचे काम करतात. त्यामुळे येत्या अधिवेशनात वकिलांसाठी संरक्षण अधिनियम कायदा लागू करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. मुकूंद ओव्हाळ यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बार असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.

वकिलांना सुरक्षा हवी
निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये वकील दिवस-रात्र काम करत असतात. त्यात प्रत्येकवेळा त्यांना जोखीम पत्करावी लागते. वकिलांच्या सुरक्षितेबाबत कोणीही दखल घेतली नाही. त्याबाबत कोणीही आवाज उठवलेला नाही. त्यांच्या समस्या वरिष्ठ पातळीवर पोहचून त्यावर केवळ चर्चा झाली. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वकिलांवर हल्ले झाले आहेत. त्यात घटनेमध्ये कित्येक वकिलांचा मृत्यू झाला आहे. तर काही वकील कायमचे जायबंदी झाले आहेत. पुणे तसेच, पिंपरी-चिंचवड परिसरातही सराईत गुन्हेगारांकडून वकिलांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, त्यानंतर कडक कारवाई होत नाही.

पिंपरीतही घडली होती घटना
पिंपरी येथील न्यायालयात एका वकिलावर सराईत गुन्हेगाराने हल्ला केला होता. त्या घटनेत वकिलाच्या हाताला गंभीर जखम झाली होती. मात्र, त्यानंतर गुन्हा दाखल होऊनही त्यावर कडक कारवाई झाली नाही. त्यामुळे डॉक्टराप्रमाणे वकिलांवरील हल्ल्यांबाबत हिंसा प्रतिबंधक कायदा पारित करावा. त्यामुळे वकिलांना निर्भय वातावरणात न्यायालयीन कामकाज करता येईल, असे अ‍ॅड. मुकूंद ओव्हाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.