पुणे । कागदपत्रे सरकावून बसण्यासाठी जागा केल्याच्या रागातून कागदपत्रांना भोक पाडण्याच्या टोच्याने वकिलाच्या मानेवर, छातीवर वार केल्याच्या प्रकरणात एका वकिलास दोन वर्षे शिक्षा व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी एस. पाटील यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. तपासात हलगर्जी केल्याबद्दल तपास अधिकार्यावरही न्यायालयाने ताशेरे ओढले. अॅड. संजयराव लक्ष्मण काळे (रा. वडगांव शेरी) या वकिलाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अॅड. लक्ष्मण कुमार जाधव (33, रा. शिवाजीनगर) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे अॅड. सोमनाथ अरणे यांनी काम पाहिले.
वादवादीतून जीवघेणा हल्ला
फिर्यादी जाधव बिबवेवाडी येथील पुष्पा हाईटमधील ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाच्या कार्यालयात वकिली करताता. न्यायालयाची जागा लहान असल्याने तेथे वकिलांना बसण्याची सोय नाही. अॅड. काळेही येथेच वकिली करत होते. बाररूमध्ये जागेच्या व बसण्याच्या कारणावरून इतर वकिलांशीही अॅड. काळे यांचे वाद होत. दिनांक 14 ऑक्टोबर 2013 रोजी जाधव यांनी मारहाणीची तक्रारही दिली होती. त्यानंतर त्यांनी वागणुकीमध्ये सुधारणा आणण्याविषयी लिहूनही दिले होते. 27 ऑगस्ट 2014 रोजी अॅड. जाधव हे पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्राहक न्यायमंचात आले. कामकाज संपवून सह्या करण्यासाठी अकराच्या दरम्यान ते बाररूमध्ये गेले. तेव्हा अॅड. काळे सर्व कागदपत्रे टेबलावर पसरवून बसला होता. अॅड. जाधव यांनी कागदपत्रे सरकावून थोडी जागा केली. अचानक अॅड. काळे उठला व त्यांना शिवीगाळ करू लागला.
खटल्यात पाच साक्षीदार तपासले
तुझी भरपूर नाटके झाली, थांब आता तुला संपवतोच, असे म्हणत काळेने त्याच्या खिशातील टोचा बाहेर काढला आणि जाधव यांच्या गळ्यावर वार करायला सुरूवात केली. काही वकीलांनी आणि कर्मचार्यांनी काळेला बाहेर काढले. जाधव यांनी 100 नंबरला फोन करून तक्रार नोंदवली. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सरकारी वकील सोमनाथ अरणे यांनी या खटल्यात पाच साक्षीदार तपासले. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर. सी. उसगावकर यांनी केलेल्या तपासावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. साक्षीदारांचे जबाब उशिरा नोंदविल्याचा ठपका ठेवत वरिष्ठांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.