वाडा । पंचतत्त्व सेवा संस्था बोईसर व मराठी अभ्यास केंद्र आयोजित शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वाडा येथील स्वप्निल पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांनी सलग दुसर्या वर्षी हा विजयी करंडक मिळवला आहे.
जिल्ह्यातील विविध शाळांमधून शिक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतात. विविध प्रबोधनात्मक व शैक्षणिक विषयांवर शिक्षक आपली मते मांडतात. शारदा विद्यामंदिर अनगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणार्या पाटील यांनी यापूर्वीही विविध जिल्हा व राज्यस्तरीय वक्त्रुत्व स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. ’आजचा विद्यार्थी व हरवलेले बालपण’ या विषयावर त्यांनी यावेळी आपले वक्तव्य सादर केले.
योगेश गोतारणे प्रथम
पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन त्यांना यावेळी गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी शाळांमधून वक्त्रुत्व व निबंध स्पर्धा घेतल्या जातात पण या स्पर्धा शिक्षकांसाठीही असाव्यात ज्यामुळे शिक्षकांच्याही कलेला वाव मिळून त्यांचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना होईल यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ यांनी दिली.
यावेळी निबंध स्पर्धेमध्ये वाड्यातीलचं योगेश गोतारणे यांनीही प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्यात वाडा तालुक्याचे नाव मोठे केले. कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा दक्षता समितीचे सदस्य जगदीश धोडी, पालघर पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, संतोष सावंत, सरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच वैभवी राऊत, शिवसेेनेचे कार्यकर्ते वैभव संखे आदि मान्यवर उपस्थित होते.