पुणे । राज्यातील सर्व साखर कारखान्यांमधील वजन-काट्यांच्या तपासणीचे काम येत्या 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावेत, असे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिले. साखर संचालनालयातील गेल्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सहकार मंत्र्यांनी साखर आयुक्तालयात बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील उपस्थित होते. यावेळी राज्यातील सर्व साखर कारखान्यांमधील वजन-काटे तपासणीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर समितीची ही स्थापन करण्यात आली आहे.या समितीने वजन काट्यांची तपासणी करण्याचे काम सुरू केली असली तरी हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे या बैठकीत निदर्शनास आले आहे. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी हे काम तातडीने म्हणजे 31 डिसेंबरच्या आता पूर्ण करावे, असे सांगितले.
समितीचे काम युद्धपातळीवर
सध्या नगर, पुणे, सोलापूर, सातारा, जळगाव, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वजन-काटा तपासणी समिती नेमण्यात आली आहे. त्या-त्या भागातील जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. सध्या या समितीचे काम सुरू असून तपासणीचे अहवाल देखील येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील पाच कारखान्यांची तपासणी करण्यात आली आहे. अद्याप कुठल्याही कारखान्याच्या वजन-काट्याबाबतच्या तक्रारी आलेल्या नसल्या तरी प्रत्येक कारखान्याच्या वजनकाट्यांची तपासणी करण्याचे आदेश मात्र देण्यात आले आहेत, असे साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले. या बैठकीत साखर कारखान्यांच्या संदर्भातील काही न्यायालयीन प्रकरणांबाबत सुद्धा चर्चा झाली. या प्रकरणाची एक स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय झाला. तसेच, यशवंतसारख्या आजारी कारखान्यांच्या प्रश्नाबाबत सुद्धा जानेवारीमध्ये बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.