शिरपूर: शहरातील भुपेशभाई ग्रीन आर्मीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून गेल्या वर्षाप्रमाणे शहरासह संपूर्ण तालुक्यासाठी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील सुभाष कॉलनी येथील बनुमाय प्राथमिक शाळेत भूपेशभाई ग्रीन आर्मी व सुभाष कॉलनी मित्र परिवार यांच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बांदल,तहसीलदार आबा महाजन,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, वन विभागाचे अधिकारी नितीन बोरकर यांची उपस्थित होते.
तसेच सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, सुभाष कॉलनी परिसरातील युवक, भुपेशभाई ग्रीन आर्मीचे कार्यकर्ते, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी वड, उंबर, बेल, करंज, सिशु, कौठ, जांभूळ, बांबू, चिंच हे पर्यावरणाला आवश्यक झाडांची लागवड करण्यात आली.
50 हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा मानस
गेल्यावर्षी भूपेशभाई ग्रीन आर्मीच्यावतीने शिरपूर शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यावर्षी वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्यात आली असून 50 हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा मानस उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी व्यक्त केला. तसेच नागेश्वर मंदिर परिसरात हजारो वृक्षांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.