अमृत महोत्सवानिमित्त सुरेश वडगांवकर यांचा सत्कार : आळंदी नगरपरिषदेकडून मानपत्र
आळंदी । आळंदी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध संस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करत त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. वडगावकर यांच्याकडून प्रेरणा घेत युवकांनी काम करण्याची गरज अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली. लोकोपयोगी कार्यक्रमातून हा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील श्रींच्या पूजेने या अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर धारिवाल सभागृहात दिपप्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात झाली. वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
नगराध्यक्षांच्या हस्ते मानपत्र
आळंदी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर व नगरसेवकांच्या हस्ते सुरेशकाका वडगावकर यांना मानपत्र देण्यात आले. या मानपत्राचे वाचन डॉ. दीपक पाटील यांनी केले. खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी सत्कार करून सुरेशकाकांचे कार्याचा गौरव केला. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, डॉ. विश्वनाथ कराड, पोपटराव पवार, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, अभय टिळक, विलास कुर्हाडे, डॉ. दीपक पाटील, अजित वडगावकर, लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, शारदा वडगावकर, बबनराव कुर्हाडे, वासुदेव घुंडरे, रामदास भोसले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
आळंदी मंदिरात ग्रंथतुला
आळंदी मंदिरात श्रींची पूजा झाल्यानंतर वडगावकर यांची ग्रंथतुला करण्यात आली. हे सर्व ग्रंथ श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेजच्या वाचनालयास भेट म्हणून देण्यात आले. संगीत भजन सेवा, संजय महाराज पाचपोर यांची कीर्तनसेवा, हरिपाठ आदी विविध कार्यक्रम यावेळी झाले. गुणवंत कृषीतुल्यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. या सोहळ्यास जैन धर्मगुरू, साध्वी, गुरुसाहेब महाराज उपस्थित होते.
ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विशेष योगदान
लोकसेवेच्या क्षेत्रात 40 वर्षापेक्षा जास्त काळ वडगांवकर यांनी विविधांगी समाज विकास साधल्याने विविध संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विकासात्मक वाटचालीस त्यांचे विशेष योगदान राहिल्याने संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अॅक्टीव्हा दुचाकी गाडी त्यांना भेट देण्यात आली. ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे यांनी वडील या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. नारायण महाराज जाधव व पोपटलाल ओस्तवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्याचा गौरव
आध्यात्मिक गुरुकुल संघ, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, ध्यास फाउंडेशन, आळंदी नगरपरिषद, श्री.श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ, देहू आळंदी परिसर विकास समिती आदींच्या वतीने तसेच ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदीतील संस्थेच्या सर्व प्रशाळेतील शिक्षक व पालक संघ, माजी विद्यार्थी, नागरिक यांनी सुरेश वडगावकर यांचा सत्कार करीत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. जैनसंघातर्फे मानपत्राचे वाचन भाग्यश्री चोरडिया यांनी केले.
चित्रफीत प्रदर्शित
अमृत महोत्सवास श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार दीपक पाटील, सचिव अजित वडगावकर, उपाध्यक्ष विलास कुर्हाडे, विश्वस्त प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, अनिल वडगावकर, आनंद वडगांवकर, अभय वडगावकर, प्राचार्य गोविंद यादव, वडगावकर (कर्णावट) परिवार, सर्व शिक्षक आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजीत वडगांवकर यांनी केले. या सोहळ्यात सुरेश वडगावकर यांनी केलेल्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत प्रदर्शित झाली.