वडगावमध्ये महिलेचा मृत्यू

0
वडगाव मावळ : कान्हे येथील कळपाजवळ गाढ झोपलेल्या मेंढपाळ दाम्पत्याच्या अंगावरून कंटेनर (आरजे 32 जीए 9365) गेल्याने पत्नी इंदुबाई सिद्धू ठोंबरे (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. पती सिद्धू बाबू ठोंबरे (वय 55) गंभीर जखमी झाले. मेंढ्यांचा जीव मात्र वाचला. मेंढ्यांना चारून रात्री विश्रांतीसाठी ते झोपले होते. मुंबईवरून चाकणकडे जाताना कंटेनर चालक वीरेंद्रकुमार शर्मा रस्ता चुकल्याने येथे मोकळ्या जागेत वळताना त्यांच्या अंगावरून गेला. गंभीर जखमी इंदुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. सिद्धू यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथे उपचार सुरू आहेत. कंटेनर चालक पळून जात असताना मेंढपाळाचा मुलगा सोमनाथ ठोंबरे याने दुचाकी आडवी लावून त्याला पकडले. कंपनीतील कामगारांनीही मदत केली. परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.