वडगाव मावळ : प्रतिनिधी – वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला धक्का बसला असून दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडणुकीत शहर विकास समितीच्या अंजना सुतार विजयी झाल्या. माजी सरपंच अर्चना भोकरे यांचे वैयक्तिक शौचालय नसल्याच्या कारणावरून सदस्यपद व सरपंचपद उपजिल्हाधिकारी यांनी रद्द केल्याने सरपंच पदासाठी गुरूवारी निवडणूक घेण्यात आली. सध्या प्रभारी सरपंच म्हणून संभाजी म्हाळसकर हे काम पाहत होते. भोकरे यांचे सदस्यपद रद्द झाल्याने ग्रामपंचायतीत भाजपचे आठ व राष्ट्रवादी काँग्रेस शहर विकास समितीचे आठ असे समान बलाबल असल्याने सरपंच पदाच्या निवडीबाबत उत्सुकता होती.
बिनविरोधचे प्रयत्न फोल
सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग जागेसाठी राखीव असल्याने भाजपाकडून किरण भिलारे व शहर विकास समितीकडून अंजना सुतार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत कोणीही उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्याने सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. परंतु दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडणुकीत शहर विकास समितीच्या अंजना सुतार यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भोईर यांनी सुतार विजयी झाल्याचे जाहीर केले.
यांची होती उपस्थिती
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल भोईर व सहअधिकारी म्हणून बी. बी. दरवडे, दीपक राक्षे व ग्रामविकास अधिकारी डी. एस. शिरसट यांनी काम पाहिले. यावेळी प्रभारी सरपंच संभाजी म्हाळसकर, प्रवीण ढोरे, मयुर ढोरे, नितीन कुडे, विलास दंडेल, अनील ढोरे, सुधाकर ढोरे, मेघा बवरे, संध्या ढमाले, रुक्मिणी गराडे, स्वाती चव्हाण, आश्विनी भिलारे, सुशीला भालेराव आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
विजयी मिरवणूक
निवडीनतंर सरपंच सुतार यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, पंढरीनाथ ढोरे, सुनील ढोरे, माजी सरपंच बाळासाहेब ढोरे, अविनाश चव्हाण, राजेश बाफणा, चद्रंकांत ढोरे, भाऊ ढोरे, सोमनाथ धोंगडे आदी उपस्थित होते.