नगराध्यक्षपदासाठी 10 जण इच्छुक
वडगाव मावळ : या परिसरातील वडगाव-कातवी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज उमेदवारांनी दाखल केलेला नाही. मात्र भारतीय जनता पक्षाकडून एका नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी 10, तर 17 नगरसेवक पदाच्या जागेसाठी 57 इच्छुकांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती नगरपंचायत निवडणूक सुकाणू समिती अध्यक्ष अविनाश बवरे यांनी दिली. या वेळी मावळचे आमदार संजय भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक माऊली शिंदे, माजी नगरसेवक गणेश भेगडे आदी उपस्थित होते.
नगरसेवक पदासाठी 57 इच्छुक
सुकाणू समिती अध्यक्ष अविनाश बवरे, सहाय्यक अॅड. तुकाराम काटे, पंढरीनाथ ढोरे, सदस्य राजू चव्हाण, मिलिंद चव्हाण, अरविंद पिंगळे, सोपानराव ढोरे, भास्करराव ढोरे, बंडोपंत भेगडे, शेखर भोसले, बाळसाहेब म्हाळसकर, बाळासाहेब कुडे, भाऊसाहेब भिलारे, पंढरीनाथ भिलारे, नारायण ढोरे, नाथा घुले, सोमनाथ ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, मधुकर वाघवले आदींच्या उपस्थितीत 17 नगरसेवक पदाच्या जागेसाठी 57 इच्छुकांच्या मुलाखत घेण्यात आल्या. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी भास्करराव म्हाळसकर, चंद्रशेखर भोसले, बंडोपंत भेगडे, पंढरीनाथ ढोरे, प्रवीण चव्हाण, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, सोमनाथ ढोरे, दीपक बवरे, अनंता कुडे आदी इच्छुक उमेदवार असून, कोणाला उमेदवारी मिळणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
उमेदवारीसाठी कसरत
भाजपमध्ये नाराज झालेल्या उमेदवारांना अन्य पक्षात उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी 10 उमेदवारी अर्ज, तर नगरसेवक पदाच्या 17 जागेसाठी 57 अर्ज आल्याने सुकाणू समितीला उमदेवारी देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वडगाव येथील भाजप कार्यालयात मुलाखती असल्याने परिसरात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसत होती.