वडगाव मावळ : वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच्या अभिलेख वर्गीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. हा कक्ष अद्ययावत करण्यात आला असून, आता जुन्या दस्तऐवजाची शोधाशोध करणे ग्रामपंचायत कर्मचार्याला अधिक सोपे जाणार आहे. वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनच्या अभिलेखाचे व्यवस्थित वर्गीकरण करण्यात आले आहे. 33 वर्षनिहाय अभिलेख लावण्यात आले आहेत. विशिष्ट वर्षाचे दप्तर लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात व्यवस्थितपणे बांधण्यात आले आहे. त्यावर दस्तऐवजाचा तपशील लिहिण्यात आला असून, त्या दस्तऐवजांची यादी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचार्याचे काम अधिक सोपे झाले असून, कमीत कमी वेळेत जुने दस्तऐवज शोधता येणार आहेत.
संबंधित कर्मचार्यांना प्रशिक्षण
शासकीय तपासणी झालेले दस्तऐवज अभिलेख कक्षात ठेवले जातात. त्याचे प्रशिक्षणही संबंधित कर्मचार्यांना देण्यात आले आहे. या अभिलेख कक्षाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, गटविकास अधिकारी नीलेश काळे, सहायक गटविकास अधिकारी अप्पा गुजर, सी.डी.पी.ओ. वासनिक, विस्तार अधिकारी दराडे, कांबळे, थोरात आदींनी केली. यावेळी सरपंच संभाजी म्हाळस्कर, माजी सरपंच नितीन कुडे, ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे, ग्रामविकास अधिकारी डी. एस. शिरसाट आदी उपस्थित होते.