वडगाव पेलिस ठाण्यातील चार विभागाचां कारभार महिला पोलिसांकडे
वडगाव मावळ : सर्वच क्षेत्रात महिलांची संख्या वाढत आहे. महिलांचं नियोजन, महिला घेत असलेली काळजी आणि पेलत असलेली जबाबदारी या गोष्टी पाहता पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात चार विभागांची जबाबदारी चक्क महिला पोलीस सांभाळत आहेत. ही अतिशय आदराची आणि अभिमानाची बाब आहे.
1909 च्या सुमारास अमेरिकेमध्ये महिलांनी महिलांच्या स्वतंत्र आणि अधिकारांसाठी उभारलेल्या लढ्यापासून ते आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात मिळत असलेल्या सन्मानाचा इतिहास अतिशय वंदनीय आहे. आता समाजानेही त्यांचे अस्तित्व आणि वर्चस्व मानायला सुरवात केली आहे. त्यामुळेच पोलीस खात्यात देखील महिलांची संख्या वाढत आहे. पोलीस खात्यातील महत्वाच्या पदांवर महिलांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. महिला पोलीस कर्मचार्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज (दि. 08 मार्च) वडगाव मावळ पोलीस ठाण्यात त्यांचा गौरव करण्यात आला. हा गौरव त्यांच्या कामामध्ये प्रेरणा आणि उभारी आणेल.
महत्वाच्या विभागांची जबाबदारी
वडगाव मावळ पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार पदावर महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा साबळे आहेत. वायरलेस आणि मदतनीस अशा दोन विभागांची जबाबदारी रुपाली कोहिणकर सांभाळत आहेत. दिवसभर येणार्या नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी (सीसीटीएनएस) नोंदवून घेण्याचे काम कुंदा मसळे या महिला पोलीस करतात. तसेच वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागात पोलीस कॉन्स्टेबल योगिता गायकवाड काम करतात. तर संगीता मधे आणि तस्लिमा बैरागदार या दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल पदावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
वरिष्ठांकडून समानतेची वागणूक
पोलीस खात्यात आणि विशेषतः ग्रामीण भागात काम करणे महिला पोलीस कर्मचार्यांसाठी अतिशय आव्हानात्मक काम आहे. मात्र पोलीस ठाण्यातील सहकार्यांचे सहकार्य व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने या रणरागिणी आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. सध्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 37 पुरुष कर्मचारी व केवळ सात महिला कर्मचारी कार्यरत आहेत. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कमी असली तरी देखील काम करण्यासाठी मिळणारी ऊर्जा महत्वाची आहे. वरिष्ठ आणि सहकार्याकडून मिळणारी समानतेची वागणूक व सुरक्षिततेची जाणीव हीच आमच्यासाठी खरी ऊर्जा असल्याची भावना ठाणे अंमलदार पोलीस नाईक सीमा साबळे यांनी व्यक्त केली.