वडगाव मावळच्या सरपंच अर्चना भोकरेच

0

वडगाव मावळ : घरात वैयक्तिक शौचालय नसल्याचा ठपका ठेऊन वडगाव मावळच्या सरपंच अर्चना भोकरे यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने 28 जुलै रोजी अप्पर आयुक्तालयाने निकाल देण्याचे आदेश दिले. अप्पर आयुक्तालयाने राखून ठेवलेला निकाल  (सोमवारी) अर्चना भोकरे यांच्या बाजूने दिला आहे.

अप्पर आयुक्तालयाने सोमवारी अर्चना भोकरे यांना दिलासादायक निर्णय दिला आहे. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश ढोरे, मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ ढोरे, युवा नेते सुनील ढोरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण ढोरे, मयूर ढोरे, अनिल ढोरे, रुक्मिणी गराडे, विलास दंडेल, स्वाती चव्हाण, अंजना सुतार, संध्याताई ढमाले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम ढोरे, सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत ढोरे, माजी उपसरपंच अविनाश चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी अर्चना भोकरे यांचा सत्कार करत ग्रामपंचायतीचे झेंडावंदन भोकरे यांच्या हस्तेच करण्याचा निर्णय घेतला.

वडगाव मावळ ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना विलास भोकरे यांच्यावर सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम व घरात वैयक्तिक शौचालय नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे यांनी केली होती. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी अर्चना भोकरे यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र ठरवले व त्यांचे सरपंचपद रद्द करण्यात आले होते. परंतु आता झालेल्या निर्णयाने अर्चना भोकरे या पुन्हा सरपंचपदावर राहणार आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्चना भोकरे या भाजपच्यावतीने निवडून आलेल्या होत्या. मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यांनी केलेल्या या बंडखोरीमुळे भाजपाला ग्रामपंचायतीवरील सत्ता गमवावी लागली होती. त्या गोष्टीचे मोठे शल्य भाजपाला होते.