विद्यार्थ्यांची तिसरी पिढीला गैरसोयीचा सामना
वडगाव मावळ : वडगाव मावळ परिसरातील नाणोली व वराळे या गावातील अनेकांना प्रवास होडीतून करावा लागतो. शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना धोकादायकरित्या होडीतून प्रवास करावा लागतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची पुल बांधून देण्याची मागणी करीत आहेत. विद्यार्थ्यांची आता ही तिसरी पिढी आहे. त्यांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या काही दिवसांपासून छापून येणार्या या बातम्यांमुळे मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली असून, हा प्रश्न सोडविण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेकडून नवीन होडी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
लवकरच मंजुरी मिळणार
आमदार बाळा भेगडे म्हणाले की, पावसाळ्यामध्ये पाऊस वाढला की, नदीला पूर येत असतो. त्यावेळी या नागरिकांसाठी कोणतीच सोय केलेली नसते. आपत्कालीन व आणीबाणीच्या परिस्थिती प्रवाशांना वाचविण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था याठिकाणी नाही. वराळे-नाणोली पूल हा ग्रामीण मार्गावर आहे. शासनाच्या नियमानुसार नाबार्ड योजनेंतर्गत मंजुरी मिळावी लागते. यावर्षीच्या अंदाजपत्रकात हा पूल प्रस्तावित आहे. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच नवीन होडी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे म्हणाले की, होडी ही धोकादायक आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून दीड महिन्यात नवीन होडी आणण्यात येईल. आमदार बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पुलाच्या संदर्भांत प्रश्न मार्गी लावला जाईल. पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे म्हणाल्या की, सध्या असलेली होडी निकामी झाली असूनही, विद्यार्थी, शेतकरी प्रवास करतात. होडीमुळे धोका होऊ शकतो. नवीन होडी लवकर मिळावी व पुलाचे काम लवकर झाले पाहिजे.
पुलाचे काम जलद गतीने
नाणोली सरपंच अनिता लोंढे म्हणाल्या की, पुलाचे भूमिपूजन पन्नास वर्षांपूर्वी झाले. मात्र अद्याप पूल झाला नाही. शेतकरी, विद्यार्थी जीव धोक्यात घालून प्रवास करतात. पुलाचे काम जलद गतीने झाले पाहिजे.सभापती, गुलाबराव म्हाळसकर व माजी सभापती धोंडिबा मराठे म्हणाले की, नाणोलीतर्फे चाकण या भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासून अडचण आहे. दळणवळणासाठी 5 ते 6 किलोमीटरचा वळसा पडतो. ही अडचण लक्षात घेऊन आमदार बाळा भेगडे यांनी हा पूल मंजूर करून घेतला आहे. पंचायत समितीत नवीन होडीसाठी ठराव करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात येईल.