वडगाव मावळ येथे ग्रामसभेचे आयोजन

0

वडगाव मावळ : विविध समस्यांबाबत ग्रामस्थांना मते मांडता यावीत, यासाठी वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता ग्रामसभा आयोजित केली आहे. ही ग्रामसभा वडगाव मावळ येथील पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार असून, या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मासिक बैठकीत झाला निर्णय
कुठलेही शासन परिपत्रक नसताना केवळ उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीने पाणीपट्टीच्या दरात दुप्पटीने वाढ केली आहे. या उत्पन्न वाढीबाबत केवळ एका मासिक बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थांची मते विचारात घ्यायला हवी होती, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे या ग्रामसभेत याच विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी
दुसरीकडे, वडगावातील काही भागात शुद्ध तर काही भागात अतिशय अशुद्ध पाणीपुरवठा होतो. काही भागात दोन वेळा तर काही भागात एकच वेळ पाणी सोडण्यात येते. नळ कनेक्शन देताना दुजाभाव होतो, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी ग्रामपंचायतीकडून अडवणूक केली जात आहे, अशीही ग्रामस्थांची तक्रार आहे. यासंदर्भातही सभेत मते मांडता येणार आहेत, अशी माहिती मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ ढोरे यांनी दिली.