वडगाव शेरीत पक्ष कार्यकारणीत फेरबदल होणार का?

0

येरवडा :-वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारणीत फेरबदल होणार का? या चर्चेला कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले असून याबाबत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यावर काय निर्णय घेणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. कारण विधानसभा व पालिका निवडणुकीमध्ये शहरासह उपनगरातदेखील पक्षाला पराभवाचा जोरदार फटका बसल्याने ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आले असून ते कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्‍यांपर्यंत संपर्क साधणार आहे.

शहरात पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाल्याने तरुण वर्ग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अधिक आकर्षित झाले होते. शहरात चांगल्या संख्येने उमेदवार निवडून आल्याने पक्षाची ताकद वाढलेली दिसून येत होती.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात अनेक आंदोलने झाली. त्याप्रकारे कार्यकर्त्यांसह नागरिकांचा ही वाढलेला कल स्पष्ट दिसून येत होता. त्यातच प्रथमच ह्या मतदार संघात विभाग अध्यक्षांची माळ सादिक शेख यांच्या गळ्यात घातल्याने येरवडा वार्डातून पक्षाचे उमेदवार राजेंद्र एंडल घवघवीत मताने विजयी झाले होते. त्यातच शेख यांच्यानंतर स्वप्नील चव्हाण यांच्या गळ्यात विभाग अध्यक्षांची माळ पडल्याने मागील पालिका निवडणुकीमध्ये विश्रांतवाडी-कळस प्रभागातून पक्षाच्या सुनीता उर्फ सविता साळुंके यांनी देखील विजय मिळवला होता. गेल्या 5 वर्षांत साळुंके यांच्या रूपाने प्रभागातील विकासकामे सोडविण्यावर त्यांनी अधिक भर दिल्याने युवा कार्यकर्त्यांसह महिलादेखील मनसेकडे आकर्षित झाल्या होत्या. त्यातच तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे यांनी नारायण गलांडे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी दिल्याने गलांडे यांनी जवळपास 20 हजार मतदान घेतले होते. त्यातच वर्षाभरापूर्वी ठाकरे यांनी पुन्हा सध्याचे विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे (सरकार) यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे विभाग अध्यक्ष पद सोपविले होते. मात्र विभाग अध्यक्ष व कार्यकर्त्यांमध्ये नियोजनाचा अभाव सध्या तरी कार्यकर्ते नाराज असल्यामुळे स्पष्ट होत आहे.

कारण पक्ष वाढीसाठी शिंदे यांनी जरी वेळोवेळी आंदोलने केली असली तरी या ठिकाणी देखील पक्षात असलेली गटबाजीमुळे व प्रकरणाचा पाठपुरावा न केल्याने याचा परिणाम पक्ष बांधणीवर झाला. कारण 5 ते 6महिन्यापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये पक्षाची मोर्चे बांधणी करण्याऐवजी स्वतः शिंदे विमाननगर प्रभाग क्र. 3मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ते इतर उमेदवारांना वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे याचा फटका बसून मतदार संघात एक ही उमेदवार निवडून आणण्यात पक्षाला अपयश आले आहे. त्यातच आठवडाभरापूर्वी चंदननगर येथे झालेल्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष अजय शिंदे व गणेश सातपुते हे जातीने हजर होते. यादरम्यान पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आरोप प्रत्यारोपाच्या एकमेकांवर फैरी झाडल्या होत्या.

यामुळे प्रभागात पक्षात असलेली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ठाकरे हे दोन दिवसाच्या पुणे भेटीवर आल्याने ते शहरासह उपनगरात ही पक्षाच्या कार्यकारणीत फेरबदल करणार का? याबाबत कार्यकर्त्यात जरी चर्चा सुरू असली तरी पण प्रभागात विभाग अध्यक्ष म्हणून अनिल साळुंके किंवा भाऊसाहेब प्रक्षाळे यांची वर्णी लागते की काय? अशी चर्चा जरी असली तरी पण साळुंके यांच्या पाठीशी गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य जनतेशी साधलेला जनसंपर्क व त्यातून त्यांनी प्रभागात केलेली विकासकामांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर प्रक्षाळे हे सध्या शहराच्या पदावर कार्यरत असून साळुंके हे पक्षातील कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने जनतेचे असलेले प्रश्न मार्गी लावावेत व पक्ष कशा पद्धतीने मतदार संघात ताकदवान होईल यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते देखील त्यांना साथ देत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्त्यांनी शाखा अध्यक्षांनी विविध समस्यांसह नागरिकांचे असणारे महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे.

एकीकडे जरी इतर पक्षांना मनसे पक्षात मरगळ झाल्याचे वाटत असले तरी पण पक्षाची ताकद कशा पद्धतीने वाढविता येईल याकरिता साळुंके यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी याची धूरा स्वतः खांद्यावर घेतली असून दोन दिवसांत पक्षश्रेष्ठी मतदार संघाबाबत काय निर्णय घेणार याचे उत्तर मात्र जरी सध्या तरी अनुत्तरीत असले तरी पण मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजीचे सूर यामुळे राज ठाकरे हे विभाग अध्यक्ष बदलीबाबत काय?निर्णय घेणार याची उत्सुकता जरी कार्यकर्त्यांना लागली असली आणि ठाकरे यांनी विभाग अध्यक्षाची धुरा पुन्हा एकदा शिंदे यांच्याकडे अथवा नव्या पदाधिकार्‍याकडे सोपविली तरी मतदार संघात पक्ष वाढीसाठी प्रत्येकासमोर एक प्रकारचे आव्हानच असणार हे मात्र नक्की यासंदर्भात विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत असल्याचे कार्यकर्त्याने सांगितले. यामुळे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात पक्षाचा नवा भिडू कोण?याचे उत्तर मात्र सध्या तरी गुलदस्त्यात आहे.