वडमुखवाडीतील बेपत्ता बालिकेचा खंडणीसाठी खून

0

पिंपरी-चिंचवड : चर्‍होली येथील वडमुखवाडीमधून सात दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चार वर्षाच्या तनिष्का अमोल आरुडे (रा. साईनगर) हिचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे सोमवारी तपासात निष्पन्न झाले. तिचा खून इतर कुणी नसून आरुडे यांच्या भाडेकरूनेच केला असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. शुभम विनायकराव जामनिक (वय 21, रा. द्वारा अमोल आरुडे, कॉलनी क्रमांक 6, साईनगर, वडमुखवाडी, दिघी. मूळ गाव रिपाडखेड, मूर्तिजापूर, अकोला) व त्याचा मित्र प्रतिक उर्फ गोलू अरुण साठले (वय 23, कमलेश भाईची चाळ, रुम नं 6, वर्ल्ड फलिया, सिलवासा, दादर नगर हवेली मूळ कोकणवाडी, शिवाजीनगर, मूर्तिजापूर, अकोला अशी आरोपींची नावे आहेत.

हवी होती पाच लाखांची खंडणी
दिघी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम जामनिक व प्रतिक साठे दोघेही अमोल आरुडे यांच्याकडे भाडेकरु म्हणून होते. त्यांनी 28 जूनला तनिष्का एकटीच खेळत असताना पाहिले व तिला आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यांनी तनिष्काचा वडमुखवाडी येथेच खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अकोला येथील त्यांच्या मूळगावी म्हणजेच मूर्तिजापूरला नेले. तेथे मृतदेह जाळून पुरण्यात आला. मृतहदेह पोलिसांच्या हाती लागला असून, यातील अनेक बाबी उत्तरीय तपासानंतरच पुढे येतील, असेही त्यांनी सप्ष्ट केले. आरोपींना तनिष्काच्या वडिलांकडून पाच लाख रुपयांची खंडणी हवी होती त्यासाठी आरोपींनी तिचे अपहरण केले.

निर्दयीपणाचा कहर
चार वर्षाच्या चिमुकलीला खूपच निर्दयीपणे आरोपींनी मारुन टाकले. मित्रांच्या रुममध्ये या लहान मुलीचे उशीने तोंड दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह रेपारखेडा, मूर्तिजापूर येथे नेऊन जाळला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतेदह जमिनीत पुरुन टाकला. तनिष्का घरात खेळत असताना 28 जूनपासून बेपत्ता झाली होती. तिचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी दिघी पोलिसांत दिली होती. तिच्या बेपत्ता होण्यामुळे व तपास लागत नसल्याने गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. तसेच गावकर्‍यांनी गावाचा तसेच आजूबाजूच्या गावचा परिसर धुंडाळून काढला होता. तपास लागत नसल्याने वरीष्ठ पातळीवरून पोलिसांवर दबाबही वाढला होता.