वडापुरीतील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी समिती

0

पुणे । इंदापूर तालुक्यातील वडापुरी ग्रामपंचायतीमध्ये गटविकास अधिकारी एम.के. बिचकुले, ग्रामसेवक भिलारे आणि सरपंच यांनी 2014-17 दरम्यान शासनाच्या राबविण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये अनियमितता झाली असून याबाबतची चौकशी व्हावी अशी मागणी रिपब्लिकन युथ फोर्सच्या वतीने करण्यात आली होती. या तक्रारीच दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे़ झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दौंडचे गटविकाअधिकारी आणि उपअभियंत्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

वडापुरी ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेली कामे, यशवंत आवास योजनेतील घरकुले, पेयजल योजना, स्मशानभूमी आणि शौचालये आदी कामे ही निकृष्ठ दर्जाची झाली असून यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार संजय चंदनशिवे आणि नितीन उघडे यांंनी केली होती. या कामांमध्ये गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगणमत करुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामांबाबत दौंडचे गटविकासअधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून येत्या आठवड्यात अहवाल प्राप्त होईल असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांनी सांगितले. पासगेवस्ती समाजमंदिर ते इंदापूर अकलूज रस्ता आणि रेशनिंग दुकान ते वडापूरी स्टँड ही कामे निकृष्ट आहे. मंजूर घरे पूर्ण नसतानाही त्यांची बिले काढली आहेत. तसेच एकाच नावावर दोन घरांना मंजुरी देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल करावा
गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. त्याचे बांधकाम कमकुवत आहे. ही सर्व कामे गटविकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमताने करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.