वडापुरीत पाण्याचा प्रश्‍न गंभीर

0

विहीरींनी गाठला तळ; हंडाभर पाण्यासाठी वणवण : ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या पुर्व भागातील उजनी धरणा नजीकचे वडापूरी हे गाव. परंतु पाण्याच्या बाबतीत कायम तहानलेले. या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न फारच गंभीर बनला आहे. गावाच्या पुर्व बाजूला असणारा पाझर तलाव कोरडा पडला आहे. तर गावातील पाणी पुरवठा करणार्‍या विहीरींनीसुध्दा केव्हाच तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी परिसरातील नागरीकांना वणवण फिरण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे.

पाणी प्रश्‍नाबाबत ग्रामविकास अधिकारी व गावकामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामसेवक हे ट्रेनिंगसाठी बाहेर गावी असल्याचे सांगण्यात आले. पाणी प्रश्‍नाबाबत पंधरा दिवसांपूर्वी तहसिल कार्यालयात अर्ज सादर केला असल्याचे ग्रामसेवकाने फोनवरून सांगितले. तर वडापूरीच्या गाव कामगार तलाठी यांची तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्या समक्ष भेट घेऊन वडापूरीतील पाणी प्रश्‍नाविषयी चर्चा केली असता याबाबतीत तलाठी यांना कोणतीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरूनच प्रशासकीय अधिकारीच या प्रश्‍नाबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

अधिकार्‍यांचा ढिसाळ कारभार

इंदापूरच्या तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी माणिकराव बीचकुले यांनी वडापुरी गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल नसल्याचे सांगितले. अधिकार्‍यांच्या ढीसाळ कारभारामुळे वडापुरी ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. स्थानिक नागरीक प्रशासकीय यंत्रणेच्या ढीसाळ कारभाराला बळी पडत असून आजी माजी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष कधी देणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरीकांतून विचारला जात आहे. तर पाण्यासाठी वडापुरी ग्रामस्थ केव्हाही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे.

नळाला येते आठ दिवसातून पाणी

ऐन हिवाळ्यात ज्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असेल तेथे मुक्या जनावरांचा, गुराढोरांचे पाण्यासाठी काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. शासकीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या नळाला आठ दिवसातून एकदाच पाणी येत असल्याने गावातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. तर ग्रामस्तरावरील शासकीय प्रशासन अधिकारी हे या गावातील पाणी प्रश्‍नाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

पाझर तलावात पाणी सोडा

पाझर तलाव, ओढे, नाले, विहीरी व बोअर पाण्याअभावी कोरडे पडले असल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावारांच्या पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. सध्या पिण्याचे पाणी व वापरासाठी लागणारे पाणी रोज विकत घेण्याची पाळी वडापूरी ग्रामस्थांवर ओढवलेली असून ग्रामपंचायत मात्र पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी ग्रामस्थांकडून वसूल करत आहे. परंतु नागरीकांना पाणी पुरवठा करण्यावाषयी ग्रामपंचायत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पाझर तलाव कोरडा पडला असून शेटफळ तालाव पाण्याने नुकताच भरला आहे. परंतु तेथुन पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने वडापूरी पाझर तलावात पाणी सोडावे, अशी मागणी नागरीकांमधून होऊ लागली आहे. सध्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून पाण्याचे टँकर चालू करावे, अशी मागणी जोर धरत आहे. संतप्त झालेले स्थानिक नागरीक पाणी प्रश्‍नासाठी केव्हाही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र सध्या वडापुरीत पाहायला मिळत आहे.