वडार समाजातील विद्यार्थ्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे

0

पिंपरी-चिंचवड : वडार समाजाने महापुरुषांचे प्रेरणादायी विचार घेऊन वाटचाल सुरू केली आहे. वडार समाजाचा खडतर प्रवास अगदी प्राचीन काळापासून चालू आहे. काळ बदलला. हजारो वर्षांची प्रगती झाली. खाणी संपल्या; पण दगडावरचा घाव घालण्याची समाजावरची सक्ती अजूनही संपलेली नाही. वडार समाजातील विद्यार्थ्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आव्हाने पेलावीत, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर वडार समाज सेवा संघाच्या वतीने समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरीतील कामगार भवनात हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला पुणे महापालिकेचे उपायुक्त तुषार दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे, अ‍ॅड. मनीषा विटेकर महाडिक, संघाचे अध्यक्ष प्रदीप पवार, संघटक दत्ता जाधव, कार्याध्यक्ष संतोष मोहिते आदी उपस्थित होते.

वाईट प्रवृत्तींपासून दूर रहा
डॉ. श्रीपाल सबनीस मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नेहमी वाईट प्रवृत्तींपासून दूर राहिले पाहिजे. प्रामाणिकपणे अभ्यास करा. अंगी जिद्द असल्याशिवाय कठीण परिस्थितीत यश मिळवता येत नाही. त्यामुळे अंगी जिद्द बाळगा, खूप मेहनत घ्या. प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळवणे कठीण नाही, असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले.

संयोजनात यांचा हातभार
या कार्यक्रमासाठी सचिव संजय जाधव, सहसचिव लखन पाटकर, उपाध्यक्ष पठाण बोटे, करण डुकळे, खजिनदार सुदाम कुर्‍हाडे, सहखजिनदार पन्नालाल वेताळ, आनंद नलावडे, अनिल विटकर, चंद्रकांत पवार, सुनील पवार, सुनील वेताळ, अरूण गोटे, मारूती धोत्रे, शिवाजी विटकर, संजय पवार, लहू पवार, सुनील दांगडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पवार यांनी केले. तर संजय जाधव यांनी आभार मानले.