चोरट्यांनी लांबविला 44 हजारांचा ऐवज
जळगाव : वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी गेलेल्या यमुनानगरातील संजय निनाजी लेणेकर (54) यांच्या बंद घराचे कुलूप कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 44 हजार 300 रूपयांच्या ऐवज लांबविल्याची घटना 25 जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी रोख रक्कम, दागिण्यांसह घरातील एफ.एम.चे स्पीकरही लांबवून नेले.
पाच ते सहा दिवस घर होते बंद
अयोध्यानगर परिसरातील यमुनानगरात, संजय लेणेकर हे पत्नी आशा यांच्यासाहेबत वास्तव्यास आहेत़ एमआयडीसी परिसरातील बॅन्जो केम. इंडस्ट्रिज प्रा.लि. कंपनीत ते अकाऊंट विभागात नोकरीला आहेत. दरम्यान, वडील निनाजी लेणेकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे संजय हे 16 जानेवारी रोजी पत्नीसह बुलढाणा येथे गेले होते़ दुसर्या दिवशी 17 रोजी वडीलांचे निधन झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लेणेकर दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील शेलापूर बुद्रूक या मुळगावी गेले होते़ त्यानंतर तेथेच मुक्कामी थांबले. त्यामुळे पाच ते सहा दिवस त्यांचे घर बंद होतेे. 25 जानेवारी रोजी शेजारी राहणारी महिला सीमा सरोदे यांनी लेणेकर यांना चोरी झाल्याबाबत माहिती दिली.
दागिन्यांसह रोकडवर हात साफ
शेजारील सरादे यांनी दिलेल्या 25 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता लेणेकर दाम्पत्य जळगावला घरी आले. घरात पाहणी केली असता त्यांना सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले़ त्यातच कपाट फोडलेले व त्यातील 6 हजार रूपये किंमतीची दोन ग्रँम वजनाची चेन, 9 हजार रूपये किंमतीच्या तीन ग्रँम वजनाच्या सोन्याच्या फुल्या तसेच 1 हजार रूपये किंमतीचे दोन भार वजनाचे दाने चांदीच्या अंगठ्या, 1 हजार रूपये किंमतीची दोन भार वजनाची चांदीची चेन, 700 रूपये किंमतीची बेंटेक्सची चेन व पेंडल, 600 रूपये किंमतीच्या बेटेंक्सच्या बांगड्या, 1 हजार रूपये किंमतीचा एफ.एम. स्पीकर तसेच 25 हजार रूपयांची रोकड असा एकूण 44 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरीला लांबवून नेल्याचे समोर आले. दशक्रिया विधीचा कार्यक्रमासाठी लेणेकर पुन्हा मूळ गावी गेले. तेथून पतरल्यावर त्यांनी 7 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.