वडील मंत्री म्हणून माझ्या गुणवत्तेवर संशय का?

1

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंची कन्या श्रुतीचे पत्र

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीस परदेशात शिकण्यासाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, याप्रकरणी खुद्द बडोले यांची कन्या श्रुती हिने एक पत्र प्रसिद्ध केले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्रात तिने वडील मंत्री आहेत म्हणून माझ्या गुणवत्तेला दोष का? असा सवाल उपस्थित करून ही शिष्यवृत्ती सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

वडील मंत्री नसताना गुणवत्तेवर प्रवेश
श्रुती बडोले हिला अस्ट्रोनॉमी अँड अस्ट्रॉफीजिक्स या विषयांमध्ये पीएचडी करण्यासाठी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठमध्ये 3 वर्षांसाठी शिष्यवृत्ती कशी मिळाली असा सवाल उपस्थित झाल्यानंतर त्यांची कन्या श्रुती हिने एक पत्र लिहिले आहे. या पत्रात श्रुती म्हणते, मी आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी माझे वडील मंत्री नव्हते. युकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये मी माझे एमएस्सी पूर्ण केले. याठिकाणी गुणवत्तेनुसार माझा प्रवेश आणि शिक्षण झाले. विद्यापीठाने गुणवत्तेमुळे मला शिष्यवृत्ती दिली (सरकारी नव्हे). अवकाश संशोधनात काम करायचे हे माझे स्वप्न होते.

तीन जागांसाठी दोनच अर्ज
पीएचडी इन सायन्स यासाठी राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती करीता तीन जागा आहेत. या तीन जगासाठी केवळ दोन अर्ज आलेत. त्यात एक जागा अजूनही रिक्त आहे. वडिलांच्या मंत्रिपदामुळे माझी गुणवत्ता कमी झाली का? कुणाचाही हक्क कधी डावलला नाही आणि कधी डावलणार नाही. वडील मंत्री आहेत म्हणून शिष्यवृत्तीवर वाद होत असेल आणि माझी गुणवत्ता झाकोळली जाणार असेल तर मी शिष्यवृत्ती नाकारत आहे. पण मी शिकणार, अवकाश संशोधनात जाणारच. सावित्रीबाई आणि बाबासाहेबांचे शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी, असा आत्मविश्वास श्रुतीने पत्रात व्यक्त केला आहे.