यावल- तालुक्यातील वड्री गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरणात डोंगरदे येथील 13 वर्षीय बालकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12 वाजता घडली होती. सायंकाळपर्यंत बुडालेल्या बालकाच्या मृतदेहाचा शोध घेवूनही तो हाती लागला नव्हता मात्र शुक्रवारी सकाळी मृतदेह हाती लागल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. दीपक हरसिंग पावरा (वय 13, रा.डोंगरदे, ता.यावल) असे मृत बालकाचे नाव आहे. तो आपल्यासोबत अजून तीन जणांना घेऊन गुरे चराईसाठी धरण परीसरात आला होता. गुरूवारी दुपारी 12 वाजता तो इतर दोघांसह धरणात पोहण्यासाठी उतरला मात्र काही क्षणातच तो पाण्यात बुडाला. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर सहायक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार राजेश महाजन घटनास्थळी दाखल झाले.