वढोदा जंगलात सेवानिवृत्त सैनिकाचा खून
कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे शेगाव येथे निघाल्यानंतर कोसळले संकट : खुनाचा गुन्हा ; दोघा पिता-पूत्रांना अटक
भुसावळ : कोल्हापूर जिल्ह्यातील दोघे भाविक शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघाल्यानंतर अज्ञात आरोपींना वढोदा जंगलात नेवून त्यांना बेदम मारहाण केल्याने 52 वर्षीय सेवानिवृत्त सैनिकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतचा सहकारी गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, 5 रोजी दुपारी दोन वाजता वढोदा ते हलखेडा दरम्यानच्या जंगलात घडली. विशेष म्हणजे सहा ते सात जणांच्या टोळीने उभयंतांकडील एटीएम कार्ड, मोबाईल हिसकावून तब्बल एक लाख सहा 500 रुपयांची रोकडही खात्यातून काढली. सुरूवातीला नांदुरा येथे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो मुक्ताईनगर पोलिसात वर्ग करण्यात आला. प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) असे खून झालेल्या सेवानिवृत्त सैनिकाचे नाव आहे. खून प्रकरणी दादा हरी बन्सी पवार (23) व अजय दादा पवार (52) या पिता-पूत्रांना रविवारी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली.
वढोदा जंगलात लुटले : मारहाणीत झाला मृत्यू
प्रल्हाद शिवराम पाटील (52) व अनिल आनंदा निकम (41) यांनी शेगाव दर्शनाचा बेत केल्यानंतर दोघेही 5 रोजी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरहून औरंगाबादपर्यंत व तेथून बसने बुलडाणा गाठले व तेथून काळीपिवळीने नांदुरा गाठले. प्रवासादरम्यान प्रल्हाद पाटील यांच्या संपर्कातील पवार नामक व्यक्तीशी नांदुरा येथे दुपारी एक वाजेपर्यंत येत असल्याचे सूचित केले होते. नांदुरा येथे आल्यानंतर उभयंतांना घेण्यासाठी एका इसमाला पाठवण्यात आले व त्याच्या दुचाकीवरून दोघे मित्र निघाले. पिंपळगाव काळेबोंडे फाट्यावरून वढोदा जंगलात नेण्यात आले. यावेळी पवार नामक इसमासह पाच ते सहा जण आधीपासून उपस्थित होते. प्रवास कसा झाला? असे विचारत संबंधितानी काही कळण्याआत थेट मारहाण सुरू करीत दोघांकडील तीन एटीएम, तीन हजारांची रोकड हिसकावून घेतली तसेच एक संशयीत तीनही एटीएम कार्ड घेवून तेथून निघाला व त्याने प्रल्हाद पाटील यांच्या खात्यातून 27 हजार रुपये विड्राल केले तर दुसर्या एटीएमचा पीन चुकीचा सांगितल्याने पैसे न निघाल्याचा निरोप संशयीताना मिळाल्यानंतर प्रल्हाद यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात झाली. यावेळी प्रल्हाद पाटील यांनी त्यांचा पुतण्या सुनील पाटील यास फोन करून पैसे मागण्यास सांगितल्यानंतर एका संशयीताने सुनील यास फोन करून उभयंतांकडे दोन नंबरचे साहित्य व मांडूळ साप सापडल्याने त्यांना पोलिसांच्या तावडीत जावू न देण्यासाठी आपल्या खात्यावर 25 हजार रुपये टाकण्याचे सांगितले. 25 हजार रुपये आल्यानंतर परत 30 हजारांची मागणी करण्यात आली व त्यावेळीदेखील 30 हजार रुपये खात्यावर टाकण्यात आले.
बेदम मारहाणीत गेले प्राण
आरोपींनी फोन पे वर सुरूवातील 25 हजार व नंतर 30 हजारांची रक्कम प्राप्त झाल्यानंतर पुन्हा प्रल्हाद शिवराम पाटील (52) यांना छातीवर, पोटावर बेदम मारहाण सुरूच ठेवल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. यानंतर संशयीतांनी प्रल्हाद पाटील व अनिल निकम यांना दुचाकीवर बसवले व दिड तासांच्या प्रवासानंतर मोठ्या नदीच्या पुलाजवळ आणून टाकले. पोलिसात तक्रार केल्यास जिवंत ठारू मारू, अशी धमकी देण्यात आली. यावेळी निकम यांनी एका वाहनचालकाच्या मदतीने पाटील यांना नांदुरा येथील सरकारी दवाखान्यात हलवले असता डॉक्टरांनी प्रल्हाद पाटील यांना मयत घोषित केले.
सात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा
सेवानिवृत्त मिल्ट्री मॅन प्रल्हाद शिवराम पाटील (52, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) यांचा खून केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात सुरूवातीला नांदुरा पोलिसात खुनासह दरोडा, लूटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो मुक्ताईनगर पोलिसात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी अनिल आनंदा निकम (41, सावर्डे बु.॥, ता.कागल, जि.कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. लुटारूंनी 20 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, तीन एटीएम कार्ड,तीन हजारांची रोकड, निकम यांच्या एटीएममधील तीन हजारांची रोकड, प्रल्हाद पाटील यांच्या एटीएममधून काढलेली 25 हजारांची रोकड तसेच पुतण्याकडून फोन पे वर मागवलेले 27 हजार रुपये मिळून एकून एक लाख सहा हजार 500 रुपयांचा मुद्देमालही लुटल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अधिकार्यांची घटनास्थळी धाव
खुनाची घटना कळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, मुक्ताईनगर पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, नांदुरा पोलीस उपअधीक्षक श्रावण दत्त, मुक्ताईनगर निरीक्षक राहुल खताळ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हलखेडा येथील काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी केल्यानंतर त्यातील दोघा पिता-पूत्रांना अटक करण्यात आली.
काळ्या हळदीच्या आमिषाने बोलावल्याची चर्चा
दोन तोंडाचा मांडूळ साप वा काळी हळद देण्याच्या आमिषाने कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना संशयीत आरोपींना बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. कुर्हा, मुक्ताईनगर, वडोदा, लालगोटा या भागात काळी हळद, दोन तोंडी मांडूळ साप, नागमणी पैशांचा पाऊस पाडणारे असल्याची बतावणी केली जाते तसेच फेसबुकवर पोस्ट पाठवून काही गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या बाहेर जिल्ह्यातील लोकांना येथे बोलावून अशा प्रकारे लूटमार करतात. नागरीकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता असे करणार्यांची पोलिसात माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.