वढोदा : येथे दारुबंदीबाबत ग्रामपंचायत कार्यालयात महिला ग्रामसभा घेण्यात येवून पारित झालेला ठराव व निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षरीच्या पडताळणीला महिलांनी रांगा लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात दुसर्या दिवशी तब्बल 1245 महिलांच्या सह्यांची पडताळणी करण्यात आली. यावेळी महिलांनी आपल्या स्वाक्षरीची ओळखपत्रासह पडताळणी करवून घेतली. 25 ऑक्टोबर रोजी वढोदा येथे विशेष महिला ग्रामसभा आयोजित करुन संपूर्ण गावातून दारु हद्दपार करण्यासाठी दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला. या विशेष सभेस गावातील तब्बल 1 हजार 310 महिलांनी ग्रामसभेत हजेरी लावून ठराव पारित केला. ठरावासह या महिलांच्या स्वाक्षरीने दारुबंदीबाबतचे निवेदन उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले.
उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक निकम यांनी केली पडताळणी
निवेदनावरील महिलांच्या स्वाक्षरीची पडताळणी प्रक्रिया 7 रोजी उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यास सुरुवात झाली. यात ग्रामपंचायत कार्यालयात उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी.पी. निकम हे कर्मचार्यांसह सह्यांची पडताळणी करीत होते. महिलांनी आपल्या ओळखपत्रासह मोठ्या संख्येने हजेरी लावून या मोहिमेस प्रतिसाद दाखविला.