वढोदा वनपरीक्षेत्राला मिळाले कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल
अवैध वृक्षतोडीसह वनचाराईचे रोखण्याचे मोठे आव्हान : सचिन ठाकरे यांनी पदभार स्वीकारला
कुर्हाकाकोडा : जिल्ह्यात पट्टेदार वाघाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या वढोदा वनपरीक्षेत्राला तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कायमस्वरुपी वनक्षेत्रपाल लाभले आहेत. वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी सुत्रे हातात घेऊन कारभार स्विकारला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा वनपरीक्षेत्रात पट्टेदार वाघांसह, बिबट व हिंस्त्र श्वापदासह तृणभक्षी मोठ्या संख्येने असून त्यांचा मुक्तसंचार आहे 15 हजार हेक्टर विस्तीर्ण आणि व्यापक असा हा परीसर विविधतेने नटलेला आहे मात्र गेल्या ऑगस्ट 2021 मध्ये तत्कालीन वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांची बदली पाल येथे झाल्याने या वनपरीक्षेत्राचा कारभार हा प्रभारी सुरू असल्याने अडचणी निर्माण होत होत्या.
नऊ महिन्यानंतर मिळाले वनक्षेत्रपाल
नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बुधवार, 25 मे रोजी वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.
वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे हे गोंदिया वन विभागातील नवेगांव बांध वाघझिरा व्याघ्र प्रकल्पातून वनपाल पदावरून पदोन्नती घेऊन वढोदा वनपरीक्षेत्रात हजर झाले आहेत. वढोदा वनपरीक्षेत्रात जंगल व त्याचे संवर्धन महत्वाचे असून वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्यापुढे ते एक आव्हान असणार आहे. जंगलात कोणत्याही प्रकारचे अवैद्य काम खपवून घेतले जाणार नाही व लवकरच वढोदा वनपरीक्षेत्रातील सर्व वन कर्मचार्यांची बैठक घेवून सूचना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
जंगल समृद्ध करण्याचा प्रयत्न सचिन ठाकरे
अवैद्य चराई, वृक्षतोड आणि अतिक्रमण याबाबतीत ठोस पावले उचलले जातील. वनपरीक्षेत्रातील पट्टेरी वाघ असल्याने निश्चितच हा जंगल समृद्ध आहे आणि तो आणखी समृद्ध होऊन आबधित कसा राहिल यासाठी प्रयत्न केले जातील व काम करीत असतांना आम्हाला लोकसहभाग महत्त्वाचा असून वन्यप्रेमींसह लोकांनी सहकार्य करावे, असे वढोदा वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी सांगितले.