लिस्बन । मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात 57 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तर या आगीत सुमारे डझनांहून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आगीत होरपळून बहुतेकांचा मृत्यू झाला आहे. शआगीवर अद्यापही अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळवण्यात आलं नाही. अग्निशामक दलाचे जवळपास 500 कर्मचारी आणि 160 वाहने बचावकार्य राबवत असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग लागलेल्या परिसरात लोकांना बाहेर पडण्यात अपयश आलं आहे.
आगीचे कारण अस्पष्ट
आगीत अडकलेल्यांना मदतकार्य पोहोचविण्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, असेही पोर्तुगाल सरकारने सांगितले आहे. राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो यांनी जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.