वनक्षेत्रात 8 लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

0

यावल। राज्यात 50 कोटी वृक्ष लावड योजनेअंतर्गत जिल्ह्यास 21 लाखाचे तर यावल वनविभाग जळगाव अंतर्गत येत असलेल्या यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील वनक्षेत्रात 8.9 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य दिल्याची माहिती यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान विभागात वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचा जास्तीत जास्त सहभाग घेण्यात येणार आहे.

वृक्षलागवडीबाबत करणार जनजागृती
या मोहिमेअंतर्गत विभागात पथनाटय, वृक्षदिंडी, प्रभातफेरी, ग्रामसभा, विविध प्रसिध्दी माध्यमे यांच्या मार्फत जनजागृतीचे कार्य हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावल तालुक्यात एक लाख 28 हजार 821, रावेर तालुक्यात दोन लाख 90 हजार 53, तर चोपडा तालुक्यात चार लाख 53 हजार 26 रोपांची लागवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मोहीमेतील सहभागी ग्रामपंचायतींना पाल, गारबर्डी , यावल, नागादेवी, लासुर, कमळजादेवी, उनपदेव, बोरअजंटी, वैजापुर, कजार्णा, आणि देवझीरी या रोप वाटीकेतून रोप पोहचते करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावल वन्यजीव विभागाच्या उपवनसरंक्षक अश्वीनी खोपडे, यावल पश्चिम वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एम.डब्ल्यु. जाधव, पूर्व वनविभागाचे वनक्षेत्रपाल एम. डी. राऊत उपस्थित होते.