वनजमिनींवरील अतिक्रमण त्वरीत थांबवा

0

साक्री । तालुक्यातील माळमाथ्यवरील विविध गावांतील पारंपारिक गुरचरण, गायारान वनजमिनींवर होणारे अतिक्रमण त्वरीत थांबविणे तसेच घोणगाव, हट्ठी बु, टेंभे, आदी गावातील मेंढपाळ, ठेलारी, धनगर यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते त्वरीत मागे घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आठवड्यात निर्णय न झाल्यास आमरण उपोषण
माळमाथ्यांवरील हट्टी बु गावाच्या शिवारात शासकीय वनजमिनीवर म्हणजेच गुरचराई, गायरान जमिन यांच्यावर स्थानिक लोक अतिक्रमण करीत असल्याने मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्या चरणास जागा शिल्लक राहणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांना अतिक्रमण करण्यास रोखल्यास ते खोट्या केसेस आमच्या लोकांवर करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सामाजिक, राजकीय संघटनादेखील या लोकांना पाठिंबा देत असून स्थानीक भूमिपुत्रांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचीत ठेवत आहेत. भविष्यात संघर्ष निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. आठवड्याभरात यावर निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर संतोष गोजे, भगवान घोडके, जिभाऊ लकडे, हरी कलगुंडे, गोमा कलगुंडे, लक्ष्मण गोरे, पंडीत लकडे, मोतीराम घोडके, काळु सरगर, भगत लकडे आदींच्या सह्या आहेत.