मुंबई । लग्नासाठी सुट्टीवर जाण्याआधी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन केले. सलग द्विशतक झळकावत विराटने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, ज्यो रुट आणि केन रिचर्डसन यांच्यापैकी कोण सर्वोत्तम फलंदाज आहे याची चर्चा रंगली आहे. पण इतकी दमदार कामगिरी करुनही संदीप पाटील यांना विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा जास्त सरस वाटतो.
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाज नाहीय. आजच्या तारखेला वनडेमध्ये विराट पेक्षा रोहित शर्मा चांगला फलंदाज असल्याचे मत संदीप पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या काळात आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेल्या संदीप पाटील यांनी भारतीय निवड समितीचे प्रमुखपदही भूषवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे यात कुठलीही शंका नाही. पण वनडे आणि टी-20 मध्ये रोहितच विराटपेक्षा सरस आहे असे पाटील म्हणाले. संदीप पाटील यांचे हे व्यक्तीगत मत असले तरी ते विराटच्या चाहत्यांना अजिबात पटणार नाही. एबीपी न्यूजवर बोलताना पाटील यांनी हे मत व्यक्त केले. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत असून रोहितने संघाचे नेतृत्व करताना कुठेही कोहलीची उणीव जाणवू दिली नाही. स्वत: कर्णधारपदाला साजेशी खेळ करुन संघासमोर आदर्श ठेवला.