वनदावे तत्काळ निकाली काढा

0

धुळे । लाभार्थी आणि संबधित प्रशासनाने समन्वय साधून वनदाव्यांमध्ये असलेल्या किरकोळ त्रृटी दूर करुन प्रलंबित वनदावे तत्काळ निकाली काढावे आणि आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी वनजमीनीचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते धुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात वनजमिनीच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील लाभार्थ्यांना धुळे तालुका तहसील कार्यालयाच्या चकरा मारूनही त्यांना योग्य उत्तर देत नाही तसेच सहकार्य करत नाही त्यामुळे नागरिकांची हेळसांडळ होते. वनविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हास्तरीय वनविभाग समितीतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीही लाभार्थ्यांशी संपर्क साधून कागदपत्रांची त्वरित पूर्तता करून योग्य लाभार्थ्यांचे वनदावे निकाली काढावेत.

वनहक्क कायदा 2007 नुसार
दरम्यान, शेतीविकासासाठी वनजमीन मिळालेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून कर्जाचीही उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आ. पाटील यांनी यावेळी सांगितले. वनहक्क कायदा 2007 नुसार धुळे तालुक्यातील अनेक वनदावे प्रलंबित असून किरकोळ कारणामुळे प्रशासनाच्या फायलीत अडकून पडले आहेत. अनेकवेळा हे लाभार्थी वनपट्टे मिळावेत म्हणून वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारूनही त्यांना योग्य उत्तर व सहकार्य केले जात नाही, अशा तक्रारी लाभार्थ्यांकडून होत असतात.

वनदाव्यांचा प्रश्‍न सोडवावा
याबाबत धुळे तालुक्यातील उडाणे येथील काही लाभार्थ्यांनी वनदाव्यांचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी आ. पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आ. पाटील यांच्या उपस्थितीत धुळे प्रांताधिकारी कार्यालयात या लाभार्थ्यांसह बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्याशी चर्चा करताना आ. पाटील यांनी सांगितले की,धुळे तालुक्यात उडाणे गावासह ज्या गावांची वनदावे प्रलंबित असतील त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून ते तत्काळ निकाली काढावेत. वनदाव्याबाबत शेतकर्‍याकंडून प्रशासनाकडे मागणी होत आहे. मात्र अधिकारी योग्यरित्या मार्गदर्शन करत नसल्याचे दिसत आहे.

18 लाभार्थ्यांना वाटप
धुळे तालुक्यातील विविध गावांतील 18 लाभार्थ्यांना वनजमिनीच्या पट्ट्यांचे वाटप आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, लहू पाटील, तहसीलदार अमोल मोरे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, बाजीराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, जि.प.चे माजी सभापती शांताराम राजपूत, डॉ.दरबारसिंग गिरासे, डॉ.विलास बिरारीस, बापू खैरनार, सरपंच सोमनाथ पाटील, नायब तहसीलदार नरेंद्र उपासनी, एम. एन. ठोसर, अमित सांगळे आदी उपस्थित होते.