वनमहोत्सवातील वृक्ष लागवड झाली दिसेनासी

0

केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी

भुसावळ- शासनाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे मात्र शासनाच्या संकल्पाला शासकीय विभागाकडूनच तिलाजंली देण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे. दोन वर्षापूर्वी तालुक्यात करण्यात आलेली वृक्ष लागवड सद्यस्थितीत दिसेनासी झाली आहेत. यामुळे शासकीय विभागाकडून वनमहोत्सवात केवळ कागदोपत्री वृक्ष लागवड होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून सन 2016 मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी वनमहोत्सवाचा संकल्प करण्यात आला होता. संकल्पातंर्गत तालुक्यात किमान 25 हजार वृक्षलागवडीचे प्रत्येक विभागाला उद्दीष्ट देण्यात आले होते. यामध्ये ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परीषद शाळा व माध्यमिक विद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, पंचायत समिती, कृषी विभाग, अंगणवाडी, दीपनगर, बसस्थानक परीसर, सामाजिक वनीकरण व पोलीस ठाणे अशा सर्व विभागांना वृक्षरोपे लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यावेळी वनमहोत्सवाचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात आला होता मात्र या दरम्यान करण्यात आलेली वृक्षलागवड केवळ फोटोसेशन पुरती झाल्याचे सद्यस्थितीत दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या वृक्षलागवडीच्या संकल्पाला शासनाच्या विविध विभागाकडूनच तिलाजंली देण्याचा प्रयत्न होत असल्याने वृक्षप्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होत आहे.

रोपे झाली दिसेनासी
दोन वर्षापूर्वी शासनाच्या विविध विभाागातंर्गत करण्यात आलेली वृक्ष रोपांची लागवड सद्यस्थितीत संगोपनाअभावी दिसेनासी झाली आहे. शासनाच्या विविध विभागातंर्गत करण्यात आलेली वृक्षरोपांची लागवड केवळ फोटोसेशन पुरती झाल्याचे दिसून येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.शिवाय वृक्षरोपांच्या लागवडीवर शासनाचा लाखो रूपयाचा निधीही वाया गेल्याने वृक्षरोपे लागवडीचा उद्दीष्ट काय ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

असे देण्यात आले होते उद्दिष्ट
वनमहोत्सवातंर्गत तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीला सहा हजार 850, जि.प.शाळा दोन हजार 680, माध्यमिक एक हजार 430, प्रा.आ.केंद्र 222, पशुसंवर्धन विभाग 121, अंगणवाडी 920, इतर 30, सामाजिक वनीकरण 731, पाटबंधारे विभाग 200, तालुका कृषी विभाग तीन हजार 237, एमआयडीसी 500, सार्वजनिक बांधकाम उपविभाग एक हजार 70, आरोग्य विभाग भुसावळ 222, पंचायत समिती शिक्षण विभाग चार हजार 110, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र 50, दीपनगर आठ हजार, बाजारपेठ पोलीस ठाणे 29 व बसस्थानक परीसर 0 असे वृक्षरोपे लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते.

पुन्हा वृक्ष रोपे लागवडीचा घाट
आधी लावण्यात आलेली वृक्षरोपे संगोपनाअभावी दिसेनासी झाली असतांनाच शासनाकडून पुन्हा सर्व शासकीय विभागांना जुलै महिन्यात वृक्षरोपे लागवडीचा घाट घातला जात आहे मात्र लावण्यात येणार्‍या वृक्षरोपांच्या संगोपनाचे काय ? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.