‘वनवासी, ग्रामवासी आम्ही सर्व भारतवासी’ संकल्पनेतून काम

0

धुळे । वनवासी समाज हा प्रामाणिक आहे. ‘वनवासी, ग्रामवासी आम्ही सर्व भारतवासी’ या संकल्पनेतूनच वनवासी कल्याण आश्रम काम करते, असे प्रतिपादन दत्तात्रय पवार यांनी येथे केले.ते वनवासी कल्याण आश्रमतर्फे जनजाती रक्षा संमेलनाचे आयोजन जे. आर. सिटी हायस्कूलच्या मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनात विद्यार्थिनींनी लेझीमचे प्रात्यक्षिक सादर करून लक्ष वेधून घेतले. या वेळी संमेलन समितीचे स्वागताध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर, देवगिरी प्रांताचे अध्यक्ष चैत्राम पवार, प्रा. बी. एस. काळे, के. के. पावरा, संजय नरगान आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की ,सकारात्मक विचार करून विकास साधावा. वनवासी समाज हा अल्पसंतुष्ट असला तरी तो समाधानी आहे. वनवासी कल्याण आश्रम हे माध्यम म्हणून काम करते, असे सांगितले.

आदिवासी संस्कृतीचे जतन करा
प्रास्ताविक वनवासी कल्याण आश्रमाचे जिल्ह्याचे सचिव प्रा. बी. एस. काळे यांनी केले. के. के. पावरा म्हणाले, की आदिवासी संस्कृती लोप पावत चालली आहे. दिवसेंदिवस तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्या संस्कृतीच्या चालीरिती, रिवाज, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे संस्कार यांची जपवणूक केली पाहिजे, असे आवाहन केले. या वेळी त्यांनी आदिवासी भाषेत गीते सादर करून येथे उपस्थितांची मने जिंकली. यावेळी चैत्राम पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. संजय पाडवी यांनी केले. आभार अनारसिंग पावरा यांनी मानले.