पगार जमा केल्याच्या मोबदल्यात स्वीकारली दोन हजारांची लाच
जळगाव- कामावरून खोट्या कारणावरून काढून टाकेल तसेच खात्यात पगार जमा करण्यासाठी दोन हजारांची लाचेची मागणी करणार्या चोपडा परीक्षेत्रातील वनपाल विजय जिजाबराव तेले (39, रा.थाळनेर, ता.शिरपुर) यास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील लासुर वनविभागाच्या कार्यालयातच अटक केली. या कारवाईने भ्रष्टाचारी वनविभागाच्या अधिकार्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
वनमजुरास मागितली लाच
चोपडा तालुक्यातील 42 वर्षीय वनमजूर लासुर वनविभागाच्या कार्यालयात वनमजूर म्हणून सुमारे सहा हजार रुपये महिन्यांप्रमाणे कामास आहेत. तक्रारदाराला खोट्या कारणावरून काढून टाकण्यासाठी तसेच त्याच्या खात्यात पगार जमा केल्याच्या मोबदल्यात दोन हजाराची लाच देण्याची मागणी आरोपी वनपाल विजय तेले यांनी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्याने पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक निलेश लोधी यांच्यासह ईश्वर धनगर, नासीर देशमुख, अरुण पाटील आदींनी सापळा यशस्वी केला.
तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फोन क्रमांक 0257-2235477 वा मोबाईल 9607556556 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांनी केले आहे.