वनविभागाची जमीन हडपून त्यावर रिसॉर्ट बांधतेय भाजप मंत्र्याची पत्नी

0

रायगढ – छत्तीसगडच्या भारतीय जनता पार्टी सरकारमधील मंत्री आणि ज्येष्ठ नेते बृजमोहन अग्रवाल यांची पत्नी सविता आणि मुलाने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रातील वनजमिनीची खरेदी केली आहे. ते ४.१२ एकर शासकीय वन जमिनीवर अलिशान रिसॉर्ट बनवित आहेत. २००९ मध्ये झालेली ही जमिनखऱेदी छत्तीसगड सरकारने हात झटकल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

विद्यमान रमण सिंह सरकारमधील अधिकाऱ्यांनी या जमिन खरेदीवर प्रश्नचिन्ह उभे केले. ३० जून रोजी याबाबत घेतलेल्या आक्षेपानंतर सविता अग्रवाल यांच्या पतीच्या खात्याने आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही, असा लेखी जबाब दिला आहे.

बृजमोहन अग्रवाल १९९० पासून रायपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सध्याच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे कृषी, जलसंसाधन आणि धर्मादाय खाते आहे. पत्नी सविता यांनी जमिन खरेदी केली तेव्हा ते पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री होते. अन्य खातीही त्यांच्याकडे होती. महासमंद जिल्ह्यातील सिरपूर येथे मंत्रीपत्नीचे श्याम वाटिका नावाचे रिसॉर्ट बांधणे सुरू आहे. मंत्र्यांच्या खात्याने हा विभाग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्याचा फायदा घेत सविता आणि त्यांच्या मुलानेही पुरबासा वाणिज्य, आदित्य सृजन या कंपन्यांच्या नावावर जमिन खरेदी केली. या कंपन्यांच्या संचालक मंडळात मुलगा व आईचाही समावेश आहे.

झलकी गावातील पाच अन्य शेतकऱ्यांबरोबरच विष्णू राम साहू यांनी आपली ४.१२ एकर जमिन जलसंसाधन खात्याला मार्च १९९४ मध्ये दान केली. जवळ जवळ ६२ एकर जमिनीचा हा एक हिस्सा वन खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. नऊ वर्षांनंतर त्यावर २२.९० लाख रूपये खर्च करून वृक्षलागवड करण्यात आली. केंद्र सरकारने डिसेंबर २००३ मध्ये जमिनीच्या हस्तांतरणाला मंजूरी दिली. नंतर १२ सप्टेंबर २००९ रोजी सविता अग्रवाल आंनी ४.१२ एकर जमिन पाच लाख ३० हजार ६०० रुपयांना विकत घेतली.

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदी अधिकाऱ्यांच्या मते ही जमिन सरकारदरबारी वर्ग होणे गरजेचे होते परंतु ती विष्णु राम यांच्या नावावरच राहिली. त्यांनी ही जमिन मंत्रीपत्नीला विकली. मार्च २०१५ मध्ये ललित चद्रनाहू या मजुर संघटनेच्या नेत्याने जिल्हाधिकाऱ्यांना याचा जाब विचारल्यावर त्यांनी पुढे संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केला परंतु चार महिन्यांनी आम्ही याबाबत काही करू शकत नाही असे उत्तर अधिकाऱ्यांना मिळाले.