अमळनेर । शासनाने 1 जुलै रोजी वनदिनानिमित्त वनमहोत्सवाचे आयोजन केले असून 1 ते 7 जुलै या आठवड्याभरात 4 कोटी वृक्ष लागकवड करण्यात येणार आहे. वन महोत्सवाची अमळनेर व पारोळा वनपरिक्षेत्राकडून तयारी पुर्ण करण्यात आली असल्याची माहिती वन क्षेत्रपाल आर.एस.दसरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. पारोळा तालुक्यातील एकूण 86 ग्रामपंचायीतींना प्रति ग्रामपंचायत 375 रोपे प्रमाणे सुमारे 32 हजार 250 मोफत रोपवाटप केले जाणार आहे तर अमळनेर तालुक्यातील सुमारे 121 ग्रामपंचायतीना प्रति ग्राम पंचायत 375 प्रमाणे 45 हजार 375 एवढे रोप मोफत वाटप होणार आहेत. सदर रोप वाटपाचा कार्यक्रम हा 21 जून पासून सुरु
करण्यात आला आहे.
1 ते 7 जुलै दरम्यान होणार लागवड
कृषी विभाग 4 हजार 800, गिरणा पातबांधारा विभाग 100, माईनर इरिगेशन विभाग 212, सहकार पणन विभाग 600, औदयोगिक प्रशिक्षण संस्था विभाग 100, पोलीस स्टेशन पारोळा 100, सहा आयुक्त कार्यालय 200, न्यायालय पारोळा 21, महसूल विभाग 55, उपकोषागार कार्यालय पारोळा 100, शिक्षण विभाग 768, आदिवासी विभाग 230, आरोग्य विभाग 128, कार्यकारी अभियंता कार्यालय 90, पशुसंवर्धन 50, अंगणवाडी 214 असे एकूण 8 हजार 668 रोपे पारोळा तालुक्यातील विभागांना पुरविण्यात येणार आहेत.
अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागांना 8 हजार 423 रोपे, पारोळा वनक्षेत्र अंतर्गत शिरसमनी व डांगर क्षेत्रात एकूण 94 हजार 750 वृक्ष विविध प्रजातीचे लागवड करण्यात येणार आहेत. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पारोळा रस्ता दुतर्फा 12 हजार 500 रोपे लागवड करण्यात येणार असून सुमारे 2 लाख 1 हजार 966 रोपे 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान लागवड करण्यात येणार आहे. सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा, खासदा ए.टी. पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी यांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे.