कोथरूड । आपल्या वनसंपदेचे जतन करणे आणि वन्यप्राण्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे आणि आपल्या वनांच्या प्रती, अभ्यारण्यांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव व्हावी याबाबत नागरिकांचे प्रबोधन व्हावे व त्यांना त्याचे आकर्षण वाटावे यासाठी उद्यम विकास सहकारी बँकेने आपल्या दिनदर्शिकेचा विषय वन्यप्राणी असा ठेवला हे त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे प्रधान वनसंरक्षक जीतसिंग यांनी काढले.उद्यम विकास सहकारी बँकेच्या 2018च्या दिनदर्शिकेच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, संजय देशपांडे, अध्यक्ष महेश लडकत, सीताराम खाडे, मनोज नायर, दिलीप उंबरकर, पी. के. कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, राजन परदेशी, महेंद्र काळे, गोकुळ शेलार आदी उपस्थित होते.
भावी काळात त्यांचे रक्षण व संवर्धन
पर्यावरणवाद्यांनी आणि शासनानेही टोकाची भूमिका न घेता समन्वयातून निसर्ग संवर्धन करावे असे मत संजय देशपांडे यांनी व्यक्त केले. आकड्यांच्या रूक्ष विषयात काम करणार्या बँकिंग क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी वनसंपदा जतन करण्याची मोहीम राबवावी वाटली. हे सुचिन्ह असून सामान्य नागरिकांना वनांचे आणि वन्य प्राण्यांचे आकर्षण वाटले तरच भावी काळात त्यांचे रक्षण व संवर्धन होइल असे ही मत देशपांडे यांनी व्यक्त केले. संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर महेश लडकत यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
जतन करण्यासाठी सहकार्य
अभ्यारण्यांबरोबरच शहरातील वनांचे जतन करणे ही गरजेचे असून यासाठी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन जीतसिंग यांनी केले. तसेच शहरात वनांना आग व वृक्षतोडीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व घटकांची बैठक बोलविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांबाबत जागृती
पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर र्हास होत आहे. हवामानातील बदल, प्रदूषणातील वाढ याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घेत आहोत याची जाणीव राहिलेली नाही आणि म्हणूनच वनसंपदा आणि राज्याचे मानचिन्ह असलेले वाघ, शेकरू, बिबट्या, चिंकारा, माळढोक या प्राण्या पक्ष्यांवर आधारित दिनदर्शिका काढली आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्यामुळे आता प्राणी वस्तीच्या भागात येत आहेत. याचा धोका ओळखून आपण शहाणे व्हावे, असे त्यांनी सांगितले.