वनहक्क दाव्यांप्रमाणे ‘वहिवाटीला खो’ ; 8 रोजी आमरण उपोषणाचा इशारा

0

यावल- तालुक्यातील आदिवासी क्षेत्र जामुनझिरा येथे राहत असलेल्या आदिवासी बांधवांना आठ वर्षांपूर्वी जिल्हास्तरीय वनहक्क समितीव्दारे मंजूर केलेले वनहक्क दाव्यांप्रमाणे वहिवाट करून देत नसल्याने तत्काळ निर्णय न घेतल्यास 8 एप्रिल रोजी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा असल्याचा इशारा लेखी तक्रारीद्वारे देण्यात आला आहे.

8 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा
या संदर्भात जामुनझिरा येथील रहिवासी सावजा गल्या बारेला, रेजला पीदा बारेला, गेमला झझाल बारेला यांनी फैजपूर विभागाचे प्रांत आधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामुनझिरा, ता.यावल या आदिवासी गावात आम्ही राहत असून 30 जुन 2010 रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीने आमचे वनहक्क दावे मंजुर करून आम्हास कायदेशीररीत्या वनहक्काचे पत्र दिले आहे. असे असतांनादेखील मागील 2 ते 3 वर्षांपासून यावल विभागाचे वनधिकारी हे आमच्या वनजमिनीवर वहिवाट करून देत नसल्याने दिनांक 15 सप्टेंबर 18 रोजी आपल्या कार्यालयात अर्ज देण्यात आले होते. या अर्जाची दखल घेत आपणाकडून वन विभाग व भूमी अभिलेख या कार्यालयास पत्र देवून दोन महिन्यांच्या आत जमिनीचे मोजमाप करून वनजमीन आदिवासी बांधवांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश पत्र असतांना या संदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या विषयी आपल्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या अधिकारी यांच्यावर कार्यवाही व्हावी, अशी मागणी देखील आम्ही लेखी निवेदनाव्दारे केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. आपल्या कार्यालयाच्या माध्यमातुन 1 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे अंमलबजावणी करून संबधीत अधिकारी यांच्याकडून वन जमिनीची वहिवाट मोजमाप करून द्यावी व आदिवासी नागरीकांवर होणारे अन्याय आठ दिवसांच्या आत दूर करावे व तसे न झाल्यास 8 एप्रिल 19 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा लेखी निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.