पुणे । पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते रेंज हिल या मेट्रो मार्गावर प्रत्यक्षात सुरुवात झाली असून आता वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या मार्गाचे काम देखील लवकरच सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या मार्गासाठी काढण्यात आलेल्या फेरटेंडरला पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून येत्या 15 दिवसांत पात्र कंपनीची निवड करण्यात येऊन लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्पष्ट केले आहे.
पाच कंपन्यांचे टेंडर
पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या 10.7 किमीच्या प्राधान्य मार्गाचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. या मार्गासह महामेट्रोने वनाझ ते सिव्हिल कोर्ट या 7.1 किमी मार्गासाठी टेंडर मागविले होते. या सात किमीच्या मार्गासाठी अपेक्षित धरलेल्या खर्चापेक्षा जादा दराने टेंडर भरण्यात आल्याने महामेट्रोने फेरटेंडर मागवण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने मागविण्यात आलेल्या टेंडरची मुदत नुकतीच संपली असून, त्यामध्ये पाच कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
टेंडरची आर्थिक छाननी
वनाझ ते सिव्हिल कोर्टसाठी एनसीसी लिमिटेड, अॅफकॉन्स, आयएल अँड एफएस, सिम्प्लेक्स आणि गॅमोन इंडिया या पाच कंपन्यांनी टेंडर भरले आहे. त्यांनी सादर केलेल्या टेंडरची तांत्रिक आणि आर्थिक छाननी 15 दिवसांत पूर्ण करण्याचा मानस महामेट्रोकडून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.