यावल । जुलै महिन्यात होणार्या वनोत्सवात तालुक्यात अडीच लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विविध शासकीय विभागांकडून लक्ष्यांक मागवला जाणार आहे. या मोहीमेसाठी लागणारी रोपे वन विभागाच्या पूर्व आणि पश्चिम विभागासह सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून घेतली जाणार आहे. तिनही विभागांमध्ये सुमारे 16 लाख 71 हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.
1 ते 7 जुलै दरम्यान राज्यभरात वनोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. राज्यभरात तब्बल 4 कोटी वृक्षरोपणाचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील प्रादेशिक वनविभागाचे पूर्व आणि पश्चिम वनक्षेत्र, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका या पाच विभागांकडून वृक्षारोपणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अडीच लाख रोपे लावण्यासाठी ग्रामपंचायती, विविध शाळा-महाविद्यालये, शासकीय तथा निमशासकिय कार्यालये, पाटबंधारे विभाग, मोर मध्यम प्रकल्प आणी कृषी विभागाअंतर्गत वृक्षारोपणाची मोहीम राबवली जाणार आहे. लक्षांक प्राप्त झाल्यावर सर्व विभागांची बैठक होणार आहे.
आराखडा तयार करुन मजुरांचे केले जातेय नियोजन
शहरातील चोेपडा रस्त्यावरील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत 4 लाख 50 हजार रोपे तयार आहेत. याच मार्गावर पूर्व वनविभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेत 7 लाख 15 हजार रोपे तयार असून पश्चिम वनक्षेत्राच्या नागादेवी रोपवाटिकेत 4 लाख आणि वाघझिरा रोपवाटिकेत 1 लाख 6 हजार रोपे तयार आहेत. यामध्ये नगरपालिका 1 हजार 500, सामाजिक वनीकरण 4 हजार 390, वनविभाग पुर्व 1 लाख 82 हजार 400, वनविभाग पश्चिम 42 हजार 896, सार्वजनिक बांधकाम विभाग 2 हजार 700 असे एकूण 5 विभाग रोप 2 लाख 47 हजार 386 रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने विविध शासकीय विभागांनी लागवडीचे नियोजन केले आहे.
वनोत्सवादरम्यान वनविभागाच्या प्रादेशिक वनक्षेत्रात तिड्या, मोहमांडली अंधारमळी या वनखंडात 1 लाख 82 हजार 400 रोपे लावण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जागा निश्चित केली असून, रोपे देखील तयार आहेत. प्रादेशिक वनविभागच्या पश्चिम वनक्षेत्रात वाघझिरा येथील वनखंड 91 तसेेच हरिपुरा येथील वनखंड 108/3 मध्ये 42 हजार 896 रोपे लावण्याची तयारी आहे. त्यादृष्टीने आराखडा तयार करून किती मजूर लागतील? याचे नियोजन केले आहे.