वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात सहा शिकारी जाळ्यात

यावल : वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या प्रयत्नात सहा शिकारी वनविभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. शनिनारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे शिकार्‍यांनी विद्युत प्रवाह पाण्याच्या प्रवाहात सोडून शिकारीचे नियोजन केले होते मात्र अप्रिय घटनेपूर्वीच पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

प्राण्यांच्या शिकारीसाठी पाण्यात सोडले वीज प्रवाह
वनक्षेत्र यावल पूर्वमध्ये शनिवार, 27 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कक्ष क्रमांक 81 वड्री खुर्दमध्ये आसराबारी पाडा आदिवासी वस्तीवरील विद्युत खांबावरुन केबलसह सेंट्रींगची लोखंडीतार (240 मीटर लांब) झाडांमधून वड्री धरणाकडे येणार्‍या नाल्यातील पाणी असलेल्या ठिकाणापर्यंत पसरवण्यात आली होती शिवाय वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी हा प्रकार केल्याचे उघड झाले तर सुदैवाने पथकातील यावल पूर्वचे वनपरीक्षेत्र अधिकारी, डोंगरकठोरा वनपाल, वड्री खुर्द वनरक्षकासह मोहमांडली उत्तर, हरीपुरा,निंबादेवी पश्चिम, आंबापाणीतील वनरक्षक धोक्यापासून बचावले. दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी संशयीत लावर्‍या कालू बारेला, राकेश रवींद्र चौधरी, नान्हू धनसिंग पावरा, किरण वारसिंग बारेला, लालसिंग रेबा बारेला, रमेश तारसिंग बारेला (सर्व रा.आसराबारी पाडा, वर्डी खुर्द, ता.यावल) यांना शनिवारी अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे वनरक्षक पगार, यावल उपवनसंरक्षक शेख, धुळे दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी वावरे, यावलचे सहा.वनरक्षक हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.