मुंबई : फडणवीस सरकारने जाहीर केलेली सरसकट कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक करणारी आहे. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री केवळ आकड्यांचा खेळ करतात, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार चव्हाण पुढे म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा नेमका आकडा किती हे स्पष्ट नाही. मुख्यमंत्री, सहकारमंत्री वेगवेगळे आकडे सांगतात. ही कर्जमाफी सरसकट नाही. दीड लाखावरील शेतकऱ्यांसाठी ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजना लागू करणार असल्याचे सांगतात. मात्र, आधीची चार वर्षे दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. ज्यांचे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. ते शेतकरी कुठून कर्ज भागवणार आहेत, हा प्रश्नच आहे. ओटीएस ही निव्वळ फसवणूक आहे. चालू वर्षातील कर्जाबाबतची कोणतीही योजना सरकारने स्पष्ट केलेली नाही. कर्जमाफीचे निकष, अटी खूपच जाचक आहेत. त्यातून फारच थोड्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे दिसते. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. ही रक्कम फारच अत्यल्प आहे. या कर्जमाफीबाबत नाबार्ड, रिझर्व्ह बँकेच्या भूमिका स्पष्ट नाहीत. त्यामुळे राज्य सरकारची ही सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी निव्वळ धूळफेक ठरणार आहे.
राज्य सरकारने मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कर्जमाफीची घोषणा केली. मध्यावधी निवडणुकांसाठी काँग्रेस तयार असल्याचेही खासदार चव्हाण यांनी सांगितले. सरकारमधील सहभागी शिवसेना संभ्रमात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आता शेती शिकायची काय असा सवालही त्यांनी मोहन भागवत यांच्या शेतीसंदर्भातील वक्तव्यावर केला. संघ नेहमीच शेतकरी विरोधी राहिला असल्याची टीकाही त्यांनी केली.