दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने वन डे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सुपर ओव्हर खेळवण्यात येऊ शकते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात उपांत्य फेरीचे सामने किंवा अंतिम सामना टाय झाल्यास, निकालासाठी सुपर ओव्हरच्या पर्यायाला आयसीसीने मंजुरी दिली आहे. याआधी केवळ अंतिम सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरचा पर्याय ठेवण्यात आला होता. ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धांमध्ये अनेकदा साखळी फेरीच्या लढतींमध्येही सुपर ओव्हरचा वापर झाला आहे. मात्र वन डेत याआधी एकदाही सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामन्यासाठी सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध असल्याचे आयसीसीने जाहीर केल्याचे वृत्त ‘क्रिकेट डॉटकॉम एयू’ने दिले आहे. यंदा होणाऱ्या महिला क्रिकेटच्या वन डे विश्वचषक स्पर्धेतही उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी सुपर ओव्हर खेळविण्याची मान्यता देण्यात आल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. महिला क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा यंदा इंग्लंडमध्ये खेळविण्यात येणार आहे. याशिवाय, महिला विश्वचषक स्पर्धेसाठी डीआरएस पद्धत देखील उपलब्ध असणार आहे. यापुढील काळात पुरूष आणि महिला अशा दोन्ही ट्वेन्टी-२० स्पर्धांसाठी देखील डीआरएस प्रणालीला मान्यता दिली आहे.
दुबईमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेसाठीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून उपांत्य आणि अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळविण्यासाठीची मान्यता आयसीसीने दिली आहे. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये याआधी केवळ अंतिम फेरीतच सुपर ओव्हरचा पर्याय उपलब्ध होता. बाद फेरीत सुपर ओव्हरचा नियम लागू करण्यात आला नव्हता. यावेळेस स्पर्धेच्या अंतिम फेरीसोबतच उपांत्य फेरीतील सामन्यातही सुपर ओव्हर खेळविण्यात येईल, असे आयसीसीने ठरविले आहे. पण वन डेमध्ये आजवर एकदाही सुपर ओव्हर खेळविण्यात आलेली नाही. उपांत्य फेरीतील सामने देखील चुरशीचे होतात. त्यामुळे उपांत्य फेरीत सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरची संधी देऊन विजेता ठरविण्यात यावा, अशी सोय करण्यात येणार नाही.