मुंबईच्या पीयूष गोयल यांनी ज्या दिवशी केंद्रीय रेल्वे मंत्रिपदाचा भार स्वीकारला त्याच दिवशी मुंबईत केवळ एक रुपयात रुग्णांना आरोग्यसेवा देणारा वन रुपी क्लिनिक हा आरोग्यसेवेमधला आगळावेगळा उपक्रम बंद करण्याचा निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घेतला, हा खचितच योगायोग असावा. वैद्यकीय उपचाराचा वाढता खर्च पाहता केवळ एक रुपयात रुग्णांना आरोग्य सेवा देणारा वन रुपी क्लिनिक हा उपक्रम समाजकंटक आणि मूठभर लोकांच्या त्रासाला कंटाळून बंद करण्याचा निर्णय वेदना देणारा आहे.अंबरनाथ रेल्वे स्टेशन बाहेर क्लिनिकच्या उभारणीस काही स्थानिकानी आक्षेप घेतला आहे. यापूर्वी दादर रेल्वे स्टेशनमध्ये काम सुरू असताना निनावी फोन करून काम थांबवण्यात आले होते. जिथे जिथे ही क्लिनिक सुरू आहेत तिथे त्रास सुरू आहे म्हणून ही क्लिनिक बंद करावीत, असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. सरकारी इस्पितळातही नोंदणी फी किमान दहा रुपये असताना या क्लिनिकमध्ये फक्त एका रुपयात उपचार सुरू केले जातात.
मराठवाड्यातील भूम-परांडा येथून एमबीबीएसच्या शिक्षणासाठी 2003 साली पहिल्यांदा मुंबईत आलेल्या राहुल घुले या विद्यार्थ्याने केईएम रुग्णालयातून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. वडील शिक्षक त्यामुळे लहानपणापासून सामाजिक संस्कार झालेले, शिक्षण घेत असताना मुंबईत छात्र भारती या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आल्यावर फुले, शाहू, आंबेडकर, गांधी, सानेगुरुजी या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यातूनच समाजासाठी काही तरी करायचं ही भावना प्रबळ झाली. यातूनच पुढे या वन रुपी क्लिनिकचा जन्म झाला असावा. दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड आणि ठाणे या मध्य रेल्वेच्या स्टेशनवर सध्या ही क्लिनिक सुरू आहेत. वडाळा, वाशी, मानखुर्दसह एकोणीस ठिकाणी या क्लिनिकला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली. अपघात, हृदयविकार, मुलांची डिलिव्हरी यांसारख्या तातडीच्या सेवा विनामूल्य केल्या जातात, तर एक रुपयात ट्रीटमेंट लिहून दिली जाते व गोळ्या औषधे दिली जातात. औषधांवर 15% सवलत दिली जाते, सिटी स्कॅन, सोनोग्राफीमध्ये 50% सवलत दिली जाते.
खेड्यातील माणसांना अल्प दरात आरोग्य सेवा मिळावी म्हणून हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात एसटी स्टँडच्या माध्यमातून नेण्याचा मानस डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केला. लवकरच मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाईनगर आणि पंतनगर या वसाहतीत हा प्रकल्प सुरू होतोय. सरकारला समांतर आणि पूरक अशी ही परवडणारी आरोग्य सेवा आहे.
आपल्या अर्थसंकल्पात आरोग्यावर जास्त तरतूद असली पाहिजे आणि आरोग्याची चळवळ उभी राहिली पाहिजे, असे त्यांचे स्वप्न आहे. जसे कंपनीचे शेअर्स असतात तसे लोकांना सभासद करून लोकांनी लोकांसाठी बनवलेले हॉस्पिटल उभे करण्याचा मानस डॉ. राहुल यांनी व्यक्त केला. असा हा लोकांप्रति अर्पण केलेला प्रकल्प केवळ काही मूठभर लोकांच्या विरोधासाठी बंद करावा लागतो, ही दुर्दैवी बाब आहे. वैद्यकीय उपचाराचा वाढता खर्च पाहता गोरगरीब तसेच आयत्या वेळेस उपचाराची गरज भासणार्या मध्यमवर्गीय रेल्वे प्रवाशांसाठी हा फार मोठा दिलासा होता, अन्य खासगी सेवांच्या तुलनेत अतिशय कमी दरात इतर वैद्यकीय तपासण्या, क्लिनिकमध्ये जागच्या जागी निदान करण्याची सुविधा, मुंबईकरांना येता जाता रेल्वे स्टेशनच्या आवारात करून देण्याची ही अभिनव कल्पना होती. या क्लिनिकमुळे आजपर्यंत सुमारे वीस हजार मुंबईकरांनी याचा लाभ घेतला. या अशा प्रकारच्या सेवाभावी वृत्तीने काम करणार्यालोकांना त्रास देणार्या प्रवृत्ती झपाट्याने वाढताहेत त्या प्रवृत्तींना सिव्हिल सोसायटीने उत्तर देण्याची गरज आहे. प्रचंड नफेखोरी करणारी हॉस्पिटल, गरज नसताना चाचण्या करणारी सेंटर्स, महागडी हॉस्पिटल, अपुरी आरोग्यसेवा याला पर्याय म्हणून डॉ. राहुल घुले सारखे तरुण डॉक्टर पुढे येत असतील, तर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आपण अशी आशा करू या की, रेल्वे प्रशासन आणि मुंबईकर असलेले नवीन रेल्वेमंत्री यातून काहीतरी मार्ग काढतील आणि अशा प्रकल्पाच्या बाजूने उभे राहतील आणि ही आरोग्याची चळवळ देशभर फोफावेल त्या दिवसाची आपण वाट पाहू.
-शरद कदम
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल,मुंबई
9224576702