वरखेडी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

0

महिनाभरपासून पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती; हातपंपही बिघडला
पाण्यासाठी संतप्त महिलाचा हंडा मोर्चा; वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

वरखेडी ता पाचोरा – महिनाभरपासून पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती व त्यातच आता हातपंपही नादुरूस्त झाल्याने वरखेडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत असून अखेर आज काही संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा नेत ग्रामपंचायतील कुलूप ठोेकले. या गंभीर समस्ये बाबतीत स्थानिक प्रशासनाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्या, लवकरात लवकर हा पाणी प्रश्‍न सोडवून असे आश्‍वासन मोर्चेकर्‍यांना सरपंच व उपसरपंच यांनी यावेळी दिले आहे. उन्हाचा पारा 40 च्या वर गेला असताना वरखेडीकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक विहिरी, नदीपात्र, धरण, तलाव विहिरी सर्व ठिकाणी पाण्याचा ठणठणाट असून ग्रामस्थांची पाण्यासाठी उन्हाळ्यात भटकंती होत आहे.

पाणी टंचाईचे चटके
वरखेडी व परिसरात यंदा अल्पशा प्रमाणत पाऊस झाला. याचा परिणाम म्हणून मार्चमध्ये वरखेडीला पाणी टंचाईचे चटके सुरू झाले होते. एप्रिल उजाळूनही ही समस्या मार्गी लागलेली नसून आगामी दीड महिना कसा जाईल या चिंतेत ग्रामस्थ आहेत. परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत असून 15 ते 20 दिवसा आड पाणी पुरवठा केला जात होता. परंतु आता महिनाभरापासून नळांना पाणी येणेच बंद झाले आहे. या पाणी टंचाईच्या समस्येमुळे ग्रामस्थांचे पाण्या अभावी अतोनात हाल होत असून जिल्हा पातळीवरून उपाययोजनांची मागणी होत आहे.

अडचणी वाढल्या
काही विशिष्ट भागांमध्ये दहा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने हा भेदभाव का असा प्रश्‍न विचारत संतप्त होऊन महिलांनी ग्रामपंचायत वरती हंडा मोर्चा नेऊन कार्यालयास कुलूप ठोकल. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून ग्रामपंचायत कार्यलया जवळील हातपंप ही नादुरुस्त झाला असल्याने अडचणी अधिकच वाढल्या आहे. पाण्यासाठी तत्काळ काहीतरी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी मोर्चकरी महिलांनी केली.

योजनेअंतर्गत समस्या सोडविणार
या गावासाठी बहुळा नदी पत्रातील जुनी पाणीपुरवठा योजना, के.टी.वेअर राजुरी लघुपाटबंधारे धरणातून जामने पाझर तलावातुन गावाला पाणी पुरवठा करणार्‍या सार्वजिन विहिरी आहेत. या सर्व ठिकाणी पाण्याचा ठणठणाट असून नदीपत्र, धरण व तलाव विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. गावासाठी नुकतीच महाजल योजने अंतर्गत बहूळा धरणावरून पाणीपुरवठा योजनेचे काम चालू असून त्यासाठी खोदण्यात आलेल्या विहिरीवरून गावासाठी पाणीपुरवठा बर्‍यापैकी करण्यात येत होता. परंत तीपण विहीर आटल्याने गावास पाणी टंचाई समोरे जावे लागत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा योजनेअंतर्ग पाणी पुरवठा सुरळीत सुरू करू, असे आश्‍वासन सरपंच सीमा धनराज पाटील व उपसरपंच संतोष दौलत पाटील यांनी मोर्चेकरी महिलांना दिले आहे.