वरखेड्याच्या तिरमली कुटुंबियांचे राज्यमंत्र्यांकडून सांत्वन

0

पक्षातर्फे तीनही कुटुंबांना मदत ; सुरळीत वीजपुरवठ्याच्या सूचना
चाळीसगाव- नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या वरखेडे खुर्द येथील तीनही कुटुंबियांची राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी भेट घेत सांत्वन केले. पक्षातर्फे तीनही कुटुबियांना प्रत्येकी 11 हजारांची मदत देण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेण्यात आल्या व शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री पाटील यांनी दिले. प्रसंगी छावण्यांची पाहणी केल्यानंतर प्रांत, तहसीलदार व वनविभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून त्यांना सूचना देण्यात आल्या. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी औरंगाबादहून खाजगी शार्प शूटर आणावेत, असे मंत्री म्हणाले.

तर आठ ठिकाणी पिंजरे आहेत तेथे जिवंत बकर्‍या ठेवावेत व बिबट्याच्या अधिवास असलेल्या भागात वीजपुरवठा सुरळीत राहण्याच्या सूचना वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना त्यांनी केल्या. शेतकर्‍यांचे जे नुकसान होत आहे त्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भरपाई संदर्भात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रसंगी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर.ओ.पाटील, जिल्हा परीषद माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील, जि.प.चे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.