वरखेड्यातील बालकावर हल्ला, उघड झाला बनाव

0
वनविभागाच्या चौकशीत माहिती झाली उघड
चाळीसगाव : तालुक्यातील वरखेडे खुर्द परीसरातील मेंढपाळ वस्तीवर 14 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला चढवल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती तर वनविभागाच्या अधिकार्‍यांसह पथकाने धाव घेत मेंढपाळ काठेवाडी कुटुंबियांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या माहितीत तफावत आढळल्याने तो हल्ला बिबट्याचा नसल्याचे मानद वनजीवरक्षक राजेश ठोंबरे म्हणाले. गोपाळ रघु काठेवाडी (14) या बालकावर हल्ला केल्याचा बनाव काठेवाडींनी केल्याचे उघड झाले आहे. वनविभागाने केलेल्या चौकशीत प्रत्यक्षात हा हल्लाच झाला नसून काठेवाडींनी बनाव केल्याचे राजेश ठोंबरे म्हणाले.
हल्ल्याची खोटी माहिती : वरखेडे सरपंचावर कारवाईसाठी पोलिसांना पत्र 
धुळ्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार वरखेडे सरपंच यांनी 4 रोजी पहाटे चाळीसगाव वनपरीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना दूरध्वनीवरून वरखेडेजवळील नवेगावात बिबट्याने हल्ला करीत लहान मुलाला जखमी केल्याचे कळवल्यानंतर प्रत्यक्षात खातरजमा केल्यानंतर ही बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले. मेहुणबारे पोलिसात या संदर्भात कारवाई करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची मोहिम तीव्र
नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने मोहिम तीव्र केली आहे. 23 ट्रॅप कॅमेरे, दहा पिंजरे व पाच खुली भक्ष तैनात करण्यात आली आहे. गिरणा काठावरील दरेगार परीसरात शेतात पायी गस्त घालून 3 रोजी बिबट्याचा शोध घेण्यात आला. पायी गस्त तसेच वाहनाने गस्त घालणार्‍या पथकांना बिबट्याचे ठसे वा विष्ठा आढळल्यास विष्ठा गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पिंपळवाड म्हाळसा  परीसरात अतिरीक्त सात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. औरंगाबादच्या शार्प शुटरतर्फे थर्मल सेन्सर कॅमेर्‍याद्वारे बिबट्याचा 3 रोजी शोधदेखील घेण्यात आल्याचे वनविभागाने कळवले आहे.